भूम – शहरातील हिवरा ते डीसीसी बँक परिसरात अवैध जनावरांचे वाहतूक करणारे पकडल्याच्या कारणावरून अज्ञात इसमांनी अंकुश गायकवाड आणि त्यांचे चुलत भाऊ श्रीराम गायकवाड यांना लाथाबुक्क्यांनी आणि दगडांनी मारहाण केली. या प्रकरणी भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6.10 ते 7 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. 12 ते 15 अज्ञात लोकांनी अंकुश लक्ष्मण गायकवाड (वय 41, रा. नळी, ता. भुम, जि. धाराशिव) आणि त्यांचे चुलत भाऊ श्रीराम गायकवाड यांना
अवैध जनावरांचे वाहतूक करणारे पकडल्याच्या कारणावरून मारहाण केली. मारहाणीत दोघेही जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी अंकुश गायकवाड यांनी 2 मार्च रोजी भुम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, अज्ञात इसमांविरोधात भा.दं.वि. कलम 118(1), 189(2), 191(2), 191(3), 190, 126(2), 324(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूम पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.