धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात परिचारिका आणि कर्मचारी असुरक्षिततेच्या संकटात सापडले आहेत. वारंवार तक्रारी करूनही व्यवस्थापनाकडून सुरक्षा देण्यात आलेली नाही. गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून वारंवार धमक्या, शिवीगाळ आणि अरेरावी होत असून, आता परिचारिकांनी काळ्या फिती लावून काम करण्याचा इशारा दिला आहे.
रुग्णालय परिसर गुंडांच्या ताब्यात!
रुग्णालयात रात्रीच्या वेळी मद्यपी, गावगुंड आणि स्थानिक दादागिरी करणारे लोक वावरण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. परिचारिकांना व कर्मचार्यांना धमक्या देण्यात येत असून, “ॲट्रॉसिटी गुन्ह्यात अडकवू,” “आमच्याकडे खूप मुली आहेत, त्यात तुम्हाला कसे अडकवायचे ते पाहतो,“ अशा अश्लील व समाजविघातक धमक्या दिल्या जात आहेत. रात्री बेडसाठी स्टाफशी भांडण, जबरदस्तीने दाखल होण्याचा आग्रह, नंतर बिले न भरता पळून जाण्याचे प्रकार रोजच्याच झाले आहेत.
परिचारिकांवर मानसिक छळ, कर्मचाऱ्यांना आर्थिक लूट
रुग्णालयात काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून परिचारिकांना मानसिक त्रास दिला जातो. काही अति-जोखमीच्या रुग्णांचे चित्रीकरण करून, ते सोशल मीडियावर व्हायरल करत डॉक्टर व परिचारिकांवर दबाव टाकला जातो. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे कर्मचाऱ्यांना स्वतःच्या सुरक्षेची चिंता सतावत आहे. काही गुंड तर दिवसरात्र रुग्णालयातच थांबून दहशत निर्माण करतात.
वाहनांचा त्रास आणि हॉस्पिटल आवारात वाढदिवसाचे धिंगाणे
हॉस्पिटल परिसरात दुचाकींचे रेस वाढवून मोठ्या आवाजात हॉर्न वाजवणे, मोठ्याने गाणी वाजवून वाढदिवस साजरे करणे, हा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे परिचारिकांना येताना-जाताना दहशतीत राहावे लागते.
सुरक्षेशिवाय परिचारिकांचे काम नको, प्रशासनाला अल्टीमेटम!
सततच्या गुंडगिरीमुळे वैद्यकीय कर्मचारी मनोबल गमावत आहेत. याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. “जोपर्यंत संबंधित गुंडांवर कठोर कारवाई होत नाही आणि रुग्णालयात सुरक्षेचे योग्य उपाय केले जात नाहीत, तोपर्यंत आम्ही काळी फित लावून काम करू,” असा इशारा महाराष्ट्र राज्य गव्हर्मेंट नर्सेस असोसिएशनने दिला आहे.
प्रशासन झोपेत, कर्मचाऱ्यांचे जीव धोक्यात!
या प्रकाराची गंभीर दखल घेऊन तातडीने सुरक्षा व्यवस्था सुधारावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक आणि राज्य नर्सेस फेडरेशन यांनाही निवेदन पाठवण्यात आले आहे. प्रशासनाने वेळीच जागे होऊन रुग्णालयात सुरक्षा न दिल्यास परिचारिका आणि कर्मचारी रस्त्यावर उतरतील, अशी संतप्त प्रतिक्रिया नोंदवण्यात आली आहे.