धाराशिव : शहरातील वरुडा रोडवरील तुळजाई हॉटेलजवळ दि. ०६ मार्च २०२५ रोजी सायंकाळी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश कैलास कांबळे आणि आकाश भीमा पुदाले (दोघे रा. भोई गल्ली, धाराशिव) यांनी दिप माणिकराव धतुरे (वय ३८, रा. गुजर गल्ली, धाराशिव) यांना शिवीगाळ करत मारहाण केली. धतुरे यांच्या तक्रारीनुसार, आरोपींनी “तुम्ही धतुरे लोक लय माजला आहात,” असे म्हणत त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण केली, तसेच “तुमचं खांदान संपवून टाकू आणि तुमची नोकरी घालवू,” अशी धमकीही दिली.
याप्रकरणी दिप धतुरे यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी महेश कांबळे आणि आकाश पुदाले यांच्याविरुद्ध भा. दं. वि. कलम 118(1), 115(2), 352, 351(2)(3), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास आनंदनगर पोलीस करत आहेत.
परंड्यात दारुसाठी पैसे न दिल्याने सख्ख्या भावाला मारहाण; गुन्हा दाखल
परंडा: परंडा तालुक्यातील पाचपिंपळा येथे दारुसाठी पैसे न दिल्याने सख्ख्या भावानेच भावाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इरफान जिलानी बागवान (रा. पाचपिंपळा) याने त्याचा भाऊ इम्रान जिलानी बागवान (वय ३८) याला दारुसाठी पैसे मागितले. इम्रानने पैसे देण्यास नकार दिल्याने इरफानने त्याला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी आणि कुऱ्हाडीने मारहाण केली. यात इम्रान गंभीर जखमी झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी इम्रान बागवान याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी इरफान बागवान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत.