मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने महाराष्ट्र हादरलेला असताना, त्यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर एक नवेच धक्कादायक प्रकरण उघड झाले आहे. संतोष देशमुख यांच्या नावाचा गैरवापर करून खंडणी वसूल करणाऱ्या आशिष विशाळ या गुन्हेगाराचा पर्दाफाश झाल्यानंतर, आता सत्य बाहेर काढणाऱ्या धाराशिव लाइव्ह आणि पत्रकारांवरच निशाणा साधला जात आहे. हे लोकशाहीला काळिमा फासणारे आहे!
मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी आशिष विशाळच्या कारवायांविरोधात आवाज उठवताच, त्याला भर रस्त्यात चोप देण्यात आला होता. याची माहिती जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना देण्यात आली, आणि त्याच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. त्यावेळी आ. सुरेश धस यांनी हात वर करून, “माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही,” असे स्पष्ट केले होते. पण आता महिनाभरानंतर, अचानक आ. सुरेश धस यांनी स्वतःच कबूल केले की, “हो, आशिष विशाळ हा माझा सहकारी आहे!”
मग प्रश्न उभा राहतो – जर तो तुमचाच माणूस होता, तर तो कोणाच्या सांगण्यावरून सरकारी अधिकाऱ्यांना धमक्या देत होता? कोणाच्या छत्रछायेखाली तो खंडणी वसूल करत होता? आणि हे सत्य बाहेर काढणाऱ्या पत्रकारांवर तुम्हाला एवढा संताप का?
पत्रकारांना का घाबरताय?
धाराशिव लाइव्हने हा प्रकार उघड केल्यावर आ. सुरेश धस यांनी उलट आम्हालाच लक्ष्य करायचे ठरवले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात त्यांनी धाराशिव लाइव्हच्या नोंदणीची माहिती मागितली आहे. एवढेच नव्हे, तर “धाराशिव लाइव्हला RNI प्रमाणपत्र नाही,” असा जावई शोध लावून पत्रकारितेचा आधार काढण्याचा प्रयत्न केला आहे.
सुरेश धस साहेब, पत्रकारितेचा गंध नसताना आपण असे वक्तव्य करणे म्हणजे निव्वळ अज्ञान नाही का? वेब पोर्टलला RNI प्रमाणपत्र लागत नाही, हे कोण समजावून सांगणार? धाराशिव लाइव्हची नोंदणी २०१५ मध्ये झाली असून, त्याचा अधिकृत क्रमांक MAHMAR/2015/61537 आहे. एवढेच नव्हे, तर आम्ही केंद्र सरकारच्या PIB (Press Information Bureau) कडे नोंदणी केलेली आहे. त्यामुळे तुमच्या अर्धवट ज्ञानाच्या आधारावर पत्रकारांना लक्ष्य करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे!
स्वतःच्या गुन्हेगार सहकाऱ्यांकडे बघा, आम्हाला शिकवू नका!
आ. सुरेश धस यांनी धाराशिव लाइव्हचे संपादक सुनील ढेपे हे तथाकथित पत्रकार आहेत, असे बेजबाबदार विधान केले आहे. अरे, आधी स्वतःच्या सहकाऱ्यांकडे बघा! खंडणीखोर आणि गुन्हेगार असलेल्या आशिष विशाळलाच जर तुम्ही सहकारी म्हणत असाल, तर तुमच्या नैतिकतेचा काय विचार करायचा?
स्वतःच शिक्षण काय, आणि पत्रकारिता काय, याचा विचार करण्याची तुमच्याकडे सवड नसेल, पण तरीही मी सांगतो –
मी बी.ए. आणि पत्रकारिता पदवी घेतलेली आहे.
मी गेली ३५ वर्षे प्रामाणिकपणे पत्रकारिता करत आहे.
धाराशिव लाइव्ह १३ वर्षांपासून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची भूमिका निभावत आहे.
मी ४० हून अधिक पुरस्कार मिळवले आहेत.
हे सर्व जनतेसमोर स्पष्ट आहे. त्यामुळे तुमच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही! मी खंडणीखोरी करत नाही, सरकारी अधिकाऱ्यांना धमक्या देत नाही, सत्य बाहेर काढण्याचे काम करतो.
आम्ही सत्य सांगण्याचा गुन्हा करत राहू!
धाराशिव लाइव्हला आणि पत्रकारांना धमकावून कोणी गप्प बसवू शकतं, असा जर कोणाचा गैरसमज असेल, तर त्यांनी तो दूर करून टाकावा. खऱ्या पत्रकारितेला विकत घेता येत नाही, आणि दबाव टाकून आम्हाला गप्पही बसवता येणार नाही.
जर सत्य बाहेर काढणे हा गुन्हा असेल, तर हा गुन्हा आम्ही सतत करू! पण खंडणीखोरी करणाऱ्या गुन्हेगारांना संरक्षण देणाऱ्या आणि सत्य सांगणाऱ्या पत्रकारांना लक्ष्य करणाऱ्या राजकारण्यांना जनतेनेच धडा शिकवायला हवा!
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हात टाकण्याचा हा प्रयत्न हाणून पाडला जाईल. पत्रकारांचे अस्तित्व संपवण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी लक्षात ठेवावे – पत्रकार झुकत नाही, झोपत नाही, आणि कधीही विकत घेतला जात नाही!
- सुनील ढेपे , संपादक, धाराशिव लाइव्ह, मो. 7387994411