धाराशिव – आ. सुरेश धस यांचा धाराशिवमधील सहकारी आणि वसुली एजंट म्हणून ओळखला जाणारा आशिष विसाळ याच्या संपत्तीचा स्रोत संशयास्पद ठरत आहे. त्याच्याकडे एकही गुंठा जमीन नाही, कोणतीही नोकरी नाही, तरीही दोन कोटींची एफडी आणि १८ लाखांची गाडी त्याने कुठून घेतली? हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
वसुली एजंट म्हणून लाखोंची उधळपट्टी?
आशिष विसाळ कधीही कोणत्याही अधिकृत व्यवसायात दिसलेला नाही, त्याच्याकडे कोणतेही ठोस उत्पन्नाचे साधन नाही, तरीही त्याने इतकी संपत्ती कशी जमवली? हा संशोधनाचा विषय बनला आहे. तो फक्त वसुली एजंट म्हणून काम करतो, सरकारी अधिकारी, नगरपालिका कर्मचारी आणि व्यावसायिकांना धमकावून पैसे उकळतो, असे आरोप वारंवार होत आले आहेत.
ACB चौकशी होणार का?
या पार्श्वभूमीवर त्याच्या आर्थिक स्रोतांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आशिष विसाळच्या बेकायदेशीर व्यवहारांबद्दल अनेक वेळा तक्रारी झाल्या आहेत, मात्र त्याच्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
नागरिकांमध्ये रोष, पोलिस आणि ACBकडून कारवाईची मागणी
धाराशिव जिल्ह्यात आशिष विसाळच्या कारवायांमुळे मोठा संताप व्यक्त केला जात आहे. नागरिक आणि मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ACB आणि पोलिसांनी तत्काळ त्याच्या संपत्तीचा मागोवा घ्यावा आणि त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
जर लवकरच चौकशी झाली नाही, तर याविरोधात मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
आ. सुरेश धस यांची डबल ढोलकी
धाराशिव: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबासाठी मदत गोळा करण्याच्या नावाखाली आशिष विशाळ नावाच्या व्यक्तीने धाराशिव शहरात खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, तो स्वतःला आमदार सुरेश धस यांचा खासगी पीए असल्याचे सांगत होता.
काही दिवसांपूर्वी जरांगे समर्थकांनी त्याला भर रस्त्यात चोप दिला होता. त्यावेळी आमदार सुरेश धस यांनीही त्याच्याशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करत, “याला आणखी तुडवा,” असे झणझणीत वक्तव्य केले होते. मात्र, १२ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात त्यांनी आशिष विशाळ याला आपला सहकारी असल्याचे नमूद केले आहे, त्यामुळे या प्रकरणात संभ्रम निर्माण झाला आहे.
आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की, धाराशिवमध्ये आशिष विशाळ नेमका कुणाच्या सांगण्यावरून खंडणी गोळा करत होता? तसेच, त्याच्याकडे दोन कोटी रुपयांची एफडी आणि १८ लाखांची कार आली कुठून? त्याच्याकडे एक गुंठा देखील जमीन नाही, त्याला नोकरीही नाही, मग एवढे पैसे त्याच्याकडे कसे आले?
या सर्व संशयास्पद बाबी पाहता, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) आशिष विशाळच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी होत आहे. प्रशासन आणि पोलीस याबाबत काय कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.