बीड जिल्ह्यातील आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्या लेटरपॅडवर धाराशिव लाइव्हविषयी खोटा आणि बदनामीकारक मजकूर लिहून, त्यांच्या नकली सहीसह तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, हा प्रकार धस यांनी उघडपणे फेटाळला असून, “ते पत्र माझे नाही आणि सहीही माझी नाही. कुणीतरी खोडसाळपणा केला आहे,” असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी TV9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत केले आहे.
आमदार धस यांनी धाराशिव लाइव्हचे संपादक सुनील ढेपे यांच्याशी कुठलाही वाद नसल्याचे सांगत, त्यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार करण्याचाही प्रश्नच येत नाही, असे ठामपणे स्पष्ट केले. त्यामुळे प्रश्न उभा राहतो – मग हे बनावट पत्र तयार केले कोण? आणि या खोडसाळपणामागे नक्की कोणाचा डाव आहे?
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत धाराशिव लाइव्हचे संपादक सुनील ढेपे यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली असून, आरोपीचा शोध घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
बनावट पत्रक, खोटी सही आणि सोशल मीडियावर अफवांचा मारा हा काही नवीन प्रकार नाही. पण यामागे कुणाचे गुपित दडले आहे? कुणाच्या राजकीय वा वैयक्तिक स्वार्थासाठी ही खोडसाळ कृती करण्यात आली? हे उघड होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!