बीड जिल्ह्यात संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलंच तापलं आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचे राईट हॅंड वाल्मिक कराड यांच्यासह पाच आरोपींना अटक झाल्यानंतर, या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत धनंजय मुंडेंवर आरोपांची राळ उडवली.
मात्र, विरोधकांमध्येच अचानक ‘गुप्त प्रेम’ पल्लवित झाल्याचं चित्र पाहायला मिळालं! भाजप आमदार सुरेश धस, जे कालपरवा ‘आकांचा आका’ म्हणत होते, तेच थेट धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची तब्येतीची विचारपूस करताना दिसले!
गुप्त भेट आणि राजकीय तर्क-वितर्क!
ही गुप्त भेट उघड झाल्यानंतर भाजपमध्ये खळबळ उडाली. सुरेश धस यांनी सफाई दिली की, “मुंडे यांची तब्येत बिघडल्याने मी केवळ चौकशीसाठी गेलो होतो.” पण प्रश्न असा आहे की, ज्या नेत्यावर थेट आरोप लावले जात होते, त्याच्याकडे अचानक तब्येतीची चौकशी करायला जाण्याची गरज का भासली?
या भेटीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितलं की, “ही फक्त परिवारिक भेट होती, आम्ही तिघेही (मी, धस आणि मुंडे) तब्बल साडेचार तास एकत्र होतो!” आता, तब्येतीची विचारपूस साडेचार तास चालते का? असा सवाल आता कार्यकर्तेच विचारू लागले आहेत.
विरोधक आक्रमक – ‘ही सरळ सरळ सौदेबाजी’
ही भेट उघड झाल्यानंतर अनेक नेते आक्रमक झाले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त करत म्हटलं की, “हे अत्यंत दुर्दैवी आहे. विरोधी नेतेच जर सौदेबाजी करत असतील, तर जनतेने विश्वास ठेवायचा कुणावर?”
राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी तर ही ‘मिलीभगत’ असल्याचा आरोप केला आहे. “ज्याने स्वतःहून सांगितलं होतं की वाल्मिक कराड माझा माणूस आहे, तोच चौकशी सुरू असताना गुप्त भेट घेतोय. हे म्हणजे सरळसरळ सौदेबाजी आहे!”
सुषमा अंधारे यांनी देखील हल्लाबोल करत सांगितलं की, “जनतेला मूर्ख बनवण्याचा हा प्रकार असला तरी आता विरोधकांवरच विश्वास ठेवायचा का?”
मराठा आंदोलक देखील नाराज!
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या भेटीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “सुरेश धस यांच्यावर समाजाने मोठा विश्वास ठेवला होता. पण आता ते सत्तेच्या आहारी जाऊन समाजाशी दगाफटका करत आहेत.”
सत्ता, साटेलोटे आणि सौदेबाजी?
ही भेट नक्की तब्येतीची चौकशी होती, की काही मोठी राजकीय डील? हा प्रश्न सध्या सगळ्यांच्या मनात घर करून बसलाय. कारण ज्यांनी दोन दिवसांपूर्वीच मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले, तेच आज त्यांची तब्येत कशी विचारतात?
कायम विरोधकांच्या विरोधात गरजेपुरते बोलणारे आणि नंतर सौदेबाजी करणारे नेते राजकारणाचा नवा ट्रेंड सेट करत आहेत का? असा सवाल आता सामान्य जनता विचारते आहे.
आता बघायचं – ‘आका’ आणि ‘आकांचा आका’ यात नक्की काय डील झालंय? की ही भेट खरंच नुसती तब्येतीची विचारपूस होती?
हेही वाचा