राजकारण म्हणजे काय? निष्पाप जनतेच्या भावनांवर खेळून सत्ता मिळवणं? की विरोधकांवर शरसंधान साधून नंतर त्यांच्या गळ्यात गळे घालणं? बीड जिल्ह्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याची वेळ आली आहे.
कालपरवा ‘आकांचा आका’ म्हणून धनंजय मुंडे यांच्यावर टीका करणारे भाजप आमदार सुरेश धस, हे अचानक मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस करायला त्यांच्या निवासस्थानी पोहोचतात! मग हा राजकीय विरोध होता की कुठला सौदा? हा सहज विचार मनात डोकावतो.
विरोधाचा स्वांग आणि सौदेबाजीची नांदी
राजकारणात विरोधक असणं हे लोकशाहीसाठी आवश्यकच. पण विरोधी पक्षनेते हे केवळ रंगमंचावरचे कलाकार असतील आणि कॅमेरा बंद होताच परस्परांच्या गळ्यात पडत असतील, तर जनता काय समजायचं?
सुरेश धस यांच्या भेटीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं, “ती फक्त परिवारीक भेट होती, आम्ही तिघं साडेचार तास एकत्र होतो!” पण प्रश्न असा आहे की, साडेचार तास ‘परिवारिक भेट’ तरी असते का? आणि असलीच तर धस यांच्या तोंडचे तीव्र आरोप कुठे गेले?
आरोपांची राळ की सौदेबाजीचा धूर?
या भेटीवर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी “ही सरळ सरळ मिलीभगत आहे!” असा आरोप केला आहे. खरंच, जे नेते कालपरवा “आकांचा आका” म्हणत होते, त्यांचेच अचानक मुंडेंवर प्रेम दाटावते? आरोपांची राळ उडवणारेच सौदेबाजीच्या धुरळ्यात हरवले का?
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही रोखठोक प्रतिक्रिया दिली, “भाजपच्या या ‘डील पॉलिटिक्स’मुळे आता विरोधकांवर विश्वास ठेवायचा तरी कसा?” मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही नाराजी व्यक्त केली आणि धस यांनी समाजाशी दगाफटका केल्याचा आरोप केला.
जनता मूर्ख नाही, ती बघतेय!
लोकशाहीत जनता मूर्ख नसते, फक्त तिच्या सहनशीलतेची परीक्षा घेतली जाते. एखादा नेता आरोप करत असेल, आक्रमक होत असेल, आंदोलकांना पाठिंबा देत असेल, तर लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. पण तोच नेता गुपचूप बंद दाराआड भेटी घेत असेल, त्याचे सूर बदलत असतील, तर त्याच्या विश्वासार्हतेला सुरुंग लागतो.
जर हा विरोध ‘विरोधासाठीचा विरोध’ असेल आणि काही दिवसांनी समेटाची भाषा सुरू होणार असेल, तर मग जनतेने त्याला विरोधी पक्ष नेता म्हणून का बघायचं?
सत्ता, संधी आणि सावलीतल्या भेटी!
आपल्या इथे ‘नेत्यांचं राजकारण’ आणि ‘कार्यकर्त्यांचं राजकारण’ यात मोठा फरक आहे. कार्यकर्ते जिवाचा आटापिटा करून आंदोलनं करतात, संघर्ष करतात. पण वरती बसलेले नेते मात्र संधी मिळताच ‘परिवारिक भेटी’च्या नावाखाली गुप्त सौदेबाजी करतात.
धस-मुंडे भेटीचं गूढ अजून सुटलं नाही. ते फक्त तब्येतीची चौकशी होती की मागे काही मोठा सौदा झाला, हे कळेलच. पण या भेटीमुळे भाजपच्या विरोधी भूमिका आणि नेत्यांची निष्ठा यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
सत्तेच्या सापशिडीतून कोण वर चढणार?
या भेटीमुळे सत्तेचा सापशिडीचा डाव सुरू झालाय. जनता आता पाहतेय – या डावात कोण सापाच्या तोंडी जाणार आणि कोण शिडीवरून वर चढणार?
पण एक गोष्ट निश्चित – नेत्यांचा हा डाव आता लपून राहणार नाही. कारण जनता ‘आका कोण’ हे ओळखतेच, आणि ‘आकड्यांचा खेळ’ही ओळखते!