धाराशिव – धाराशिव शहरातील आर. पी. कॉलेज परिसरातील डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका ३४ वर्षीय महिला विद्यार्थिनीचा पाठलाग करून अश्लील शेरेबाजी करणे, तिचा मानसिक छळ करणे तसेच तिच्या पतीला धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात दोन तरुणांविरुद्ध विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
गणेशनगर, रोहिदास कॉलनी (धाराशिव) येथील रहिवासी असलेली ३४ वर्षीय महिला ही डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयात एलएलबीचे (LL.B.) शिक्षण घेत आहे. ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास ती महाविद्यालयात गेली असताना, तेथीलच दोन आरोपींनी तिला विनाकारण त्रास देण्यास सुरुवात केली.
आरोपींनी अरेरावीची भाषा वापरून तिच्यावर शेरेबाजी केली. फिर्यादी महिला विरोध करत काही बोलत नसल्याचे पाहून आरोपींनी तिचा सातत्याने पाठलाग केला. “तुम्ही मला बोलत का नाही?” असे म्हणत लज्जा उत्पन्न होईल अशा अश्लील भाषेत अपशब्द वापरले. तसेच “तुम्ही नाही बोललात तरी आम्ही बोलणारच, जोपर्यंत तुम्ही इतर मुलींप्रमाणे आमच्याशी फ्री राहणार नाही,” अशी धमकी दिली. या प्रकारानंतर आरोपींनी फिर्यादीच्या पतीलाही धक्काबुक्की केली.
आनंदनगर पोलिसांत दोघांवर गुन्हा नोंद
या छळवणुकीनंतर पीडित महिला विद्यार्थिनीने १ ऑक्टोबर २०२६ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर फिर्याद दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे:
-
गु.र.नं. : ३९८/२०२६
-
आरोपी : प्रभूद्ध गायकवाड , सूरज काशीद
-
दाखल कलमे : भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७८ (पाठलाग करणे/Stalking), ७९ (महिला लज्जा संरक्षण/विनयभंग), ११५(२), ३५१(२), ३५१(३) आणि ३(५).



