तामलवाडी : चव्हाणवाडी (अणदूर) येथील ३१ वर्षीय लखन मछिंद्र देडे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. देडे हे गेल्या दोन वर्षांपासून सावरगाव – बोबडेवाडी येथील जीवन बोडके यांच्याकडे सालगडी म्हणून काम करत होते. ४ मे २०२४ रोजी ते अचानक बेपत्ता झाले. त्यांची आई राधाबाई देडे यांनी ७ मे रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी ९ मे रोजी ‘मिसिंग’ची तक्रार दाखल केली.
१७ मे रोजी लखन यांची बहीण सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेली असता, धक्कादायक माहिती समोर आली. लखन यांना ९ मे रोजी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते आणि दोन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. १४ मे रोजी त्यांचा बेवारस म्हणून अंत्यविधी करण्यात आल्याचे सिव्हिल हॉस्पिटल चौकीच्या पोलिसांनी सांगितले. लखन हे सुरतगाव येथे आढळून आले होते आणि कुणीतरी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.
मयत लखन यांच्या पत्नीचे एका अज्ञात इसमाशी अनैतिक संबंध होते. त्यांच्या मोबाईलमध्ये पत्नी आणि तो अज्ञात इसम यांचे फोटो सापडले आहेत. त्यामुळे लखन यांचा खून करण्यात आल्याचा संशय त्यांची आई राधाबाई देडे यांनी व्यक्त केला आहे.
तामलवाडी पोलीस या प्रकरणाचा जाणीवपूर्वक तपास करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सोलापूर सिव्हिलमध्ये लखन यांना दाखल केले तेव्हा तेथील पोलिसांनी तामलवाडी पोलिसांशी संपर्क साधला होता, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
या घटनेमुळे संतप्त झालेल्या कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. मात्र, ७ महिने उलटूनही या प्रकरणाचा कोणताही तपास केला जात नसल्याने कुटुंबियांमध्ये नाराजी पसरली आहे.