तुळजापूर | धाराशिव जिल्हा परिषदेच्या अणदूर गटासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या, ९ फेब्रुवारी रोजी तुळजापूर येथे पार पडणार आहे. या निवडणुकीत दोन मावस भावांमध्येच थेट लढत होत असल्याने जिल्ह्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे, मात्र ‘क्रॉस वोटिंग’च्या चर्चेने दोन्ही उमेदवारांची धाकधूक वाढवली आहे.
या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून डॉ. जितेंद्र कानडे आणि भारतीय जनता पक्षाकडून ॲड. दीपक आलुरे हे रिंगणात आहेत. विशेष म्हणजे, हे दोन्ही उमेदवार नात्याने मावस भाऊ आहेत. भावा-भावांमधील या राजकीय युद्धामुळे अणदूर गटातील वातावरण चांगलेच तापले होते.
‘वर मशाल, खाली कमळ’ची चर्चा
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची अणदूरमध्ये मोठी सभा झाली होती, ज्याचा फायदा डॉ. कानडे यांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी ‘वर मशाल आणि खाली कमळ’ अशा पद्धतीने क्रॉस वोटिंग झाल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या निकालात मोठा उलटफेर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पंचायत समिती गणांत चव्हाणांचे पारडे जड
दुसरीकडे, अणदूर पंचायत समिती गणातून माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू रणवीर चव्हाण निवडणूक लढवत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार रणवीर चव्हाण यांच्या विजयाची शक्यता अधिक दिसत आहे. मात्र, पंचायत समितीला एका बाजूला आणि जिल्हा परिषदेला दुसऱ्या बाजूला मतदान झाल्याने जिल्हा परिषदेच्या निकालाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
खासदार ओमराजेंची प्रतिष्ठा आणि भाजपची व्यूहरचना यात अणदूरचा गड कोण सर करणार, हे उद्या स्पष्ट होईल. क्रॉस वोटिंगचा फटका कोणाला बसतो आणि दोन भावांच्या या लढतीत बाजी कोण मारतो, याचे उत्तर उद्या मतमोजणीनंतर मिळेल.






