नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे 28 जुलै 2024 रोजी रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास न्यू लुक फुटवेअर चप्पल दुकानात मोहिउद्दीन अबुल कलाम काझी (वय 32, रा. रहिमनगर, तुळजापूर) यांना गाडीला कट मारण्याच्या कारणावरून राजअहमद उर्फ राजु बशीर कुरेशी, सलमान राजअहमद कुरेशी आणि अबुतालीम राजअहमद कुरेशी (सर्व रा. कुरेशी गल्ली, नळदुर्ग) या तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली.
याप्रकरणी काझी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर लोखंडी रॉड आणि काठीने देखील मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेची माहिती मिळताच काझी यांचे चुलत भाऊ गुलाम महम्मद अबुलउलुम काझी आणि जिलानी अबुलकलाम काझी हे घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी आरोपींनी दुकानातील काउंटरच्या काचा फोडून नुकसान केले आणि तिघांनाही जिवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर मोहिउद्दीन काझी यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 118(1), 333, 324(4), 115(2), 352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी आरोपींना अटक करण्यासाठी तपास सुरू केला आहे.