धाराशिव – जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
भुम येथे रस्ते अपघातात दोघांचा मृत्यू
दि. 24 जुलै 2024 रोजी रात्री 7:15 वाजता भुम तालुक्यातील खर्डा ते भुम रस्त्यावर सावरगाव प. च्या पुलाजवळ एक भीषण अपघात घडला. या अपघातात मोटारसायकलस्वार सुनिल रामचंद्र पवार (रा. येरमाळा) आणि त्यांच्या सोबत असलेले अनिल हनुमंत वड्डार (रा. आळंद, कर्नाटक) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार हे आपल्या मोटारसायकल (क्र. एमएच 25 ए 9552) ने पाथरुडकडे जात असताना समोरून येणाऱ्या हुंडाई एक्सेंट कार (क्र. एमएच 12 एनएक्स 1564) च्या चालकाने चुकीच्या दिशेने गाडी चालवून त्यांच्या मोटारसायकलला आणि एका बोलेरो गाडीला (क्र. एमएच 25 एडब्ल्यु 4541) धडक दिली. या अपघातात पवार आणि वड्डार हे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी मयत सुनिल पवार यांचे बंधू आश्रुबा रामचंद्र पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, भुम पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 281, 106(1), 125(ए)(बी) सह 184 मोवाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाराशिव येथे सिमेंट मिक्सरच्या धडकेत एकाचा मृत्यू, एक जखमी
धाराशिव येथील एनएच 52 रोडवर दि. 27 जुलै 2024 रोजी सकाळी 11:30 ते 12:00 च्या सुमारास एक दुर्दैवी अपघात घडला. या अपघातात ओंकार भुजंग घोंगडे (रा. घारी, सोलापूर) यांचा मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत असलेल्या वैष्णवी घोंगडे या गंभीर जखमी झाल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार घोंगडे आणि वैष्णवी घोंगडे हे रस्त्याच्या कडेला उभे असताना, सिमेंट मिक्सर (क्र. एमएच 25 एडब्ल्यु 0768) च्या चालकाने हयगयीने आणि निष्काळजीपणे वाहन चालवत त्यांना धडक दिली. या धडकेत ओंकार घोंगडे यांचा जागीच मृत्यू झाला तर वैष्णवी घोंगडे यांना गंभीर दुखापत झाली.
याप्रकरणी मयत ओंकार घोंगडे यांचे वडील भुजंग ज्ञानेश्वर घोंगडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आनंदनगर पोलीस ठाण्यात सिमेंट मिक्सर चालकाविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 281, 106(1), 125(अ), 125(बी) सह 134 अ.ब., 184 मोवाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.