धाराशिव जिल्ह्यातील चार मतदारसंघांसाठी उद्या, २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत जिल्ह्यात एकूण ६६ उमेदवार रिंगणात असून, चारही मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती रंगल्या आहेत. मतदारसंघवार उमेदवार आणि लढतींचा आढावा पुढीलप्रमाणे आहे:
धाराशिव मतदारसंघ: शिवसेनेच्या दोन गटांमध्ये थेट सामना
धाराशिव मतदारसंघात एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, खरी लढत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे आ. कैलास पाटील आणि शिंदे गटाचे अजित पिंगळे यांच्यात होत आहे. पिंगळे यांना कळंब तालुक्यात मजबूत आधार असून, आ. पाटील यांना धाराशिव शहर आणि तालुक्यातील ४३ गावांतून मोठा प्रतिसाद मिळत आहे. आ. कैलास पाटील यांचे पारडे सध्या जड असल्याचे चित्र आहे.
तुळजापूर मतदारसंघ: भाजप विरुद्ध काँग्रेस संघर्ष
तुळजापूर मतदारसंघात २३ उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत भाजपचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि काँग्रेसचे ऍड. धीरज पाटील यांच्यात होत आहे. समाजवादी पक्षाचे देवानंद रोचकरी, वंचित बहुजन आघाडीच्या डॉ. स्नेहा सोनकाटे, आणि प्रहार जनशक्तीचे अण्णासाहेब दराडे यांनीही जोरदार प्रचार केला आहे. मात्र, मतविभागणीमुळे आ. राणा पाटील यांना फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
परंडा मतदारसंघ: सावंत यांची परीक्षा; चुरशीची लढत
परंडा मतदारसंघात २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, मुख्य लढत शिवसेना शिंदे गटाचे आ. तानाजी सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माजी आमदार राहुल मोटे यांच्यात आहे. परंडा हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला असला तरी यावेळी ते डेंजर झोनमध्ये असल्याचे चित्र आहे. त्यामुळे निकाल कोणाच्या बाजूने जाईल, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
उमरगा मतदारसंघ: चौगुले यांचा चौकार हुकणार ?
उमरगा मतदारसंघात १० उमेदवार रिंगणात असून, मुख्य लढत शिवसेना शिंदे गटाचे आ. ज्ञानराज चौगुले आणि उद्धव ठाकरे गटाचे प्रवीण स्वामी यांच्यात आहे. मागील तिन्ही निवडणुका जिंकून हॅट्ट्रिक मारणाऱ्या आ. चौगुले यांची यंदा डेंजर झोनमध्ये गणना होत आहे. ते चौकार मारतील का पराभव पत्करतील, हे उद्याच्या मतदानानंतरच स्पष्ट होणार आहे.
मतदान आणि निकालाकडे लक्ष
धाराशिव जिल्ह्यातील ४ मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळत असून, उमेदवारांनी अखेरच्या क्षणी प्रचारात पूर्ण ताकद लावली आहे. उद्या होणाऱ्या मतदानातून कोण बाजी मारेल आणि कोणाचे राजकीय समीकरण बिघडेल, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी आहे.