नागपूर: बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत निवेदन केले. या प्रकरणाची एसआयटी व न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा त्यांनी केली असून ही चौकशी 3 ते 6 महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, असे ते म्हणाले.
या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी बीडच्या पोलिस अधीक्षकांची बदली करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला सांगितले. तसेच मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून 10 लाख रुपयांची मदत करण्याचीही घोषणा त्यांनी केली.
देशमुख यांच्या हत्येला 6 डिसेंबर रोजी झालेल्या वादाची पार्श्वभूमी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आवाडा एनर्जी कंपनीच्या कार्यालयावर झालेल्या मारहाणीच्या घटनेत देशमुख यांनी मध्यस्थी केली होती. या घटनेनंतर 2 दिवसांनी म्हणजे 9 डिसेंबर रोजी देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली.
देशमुख यांना आरोपींनी गाडीतच मारहाण केली. त्यानंतर गाडीतून खाली उतरवून मारहाण करण्यात आली. ज्यावेळी देशमुख यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले त्यावेळी आरोपी त्यांना सोडून पळून गेले. या सर्व प्रकरणात सातत्याने सरपंचांचा भाऊ हा या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे यांच्या संपर्कात होता, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या प्रकरणी अॅट्रोसिटी उशिरा का दाखल झाली, यावरही मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले. 6 तारखेच्या घटनेची तक्रार प्रोजेक्ट इंजिनिअर शिवाजी थोपटे यांनी दिली होती. त्यानंतर 4 दिवसांनी अतिरिक्त फिर्याद अमरदिप सोनवणे यांची दिली. सोनवणे हे मागासवर्गीय असल्यामुळे अॅट्रोसिटी दाखल करण्यात आली.
या प्रकरणात वाल्मिक कराडचाही सहभाग असल्याचे पुरावे आढळल्यास त्याच्यावरही कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
बीड जिल्ह्यात अशा प्रकारच्या गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांची पाळेमुळे खोदून काढू, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. वाळू माफिया, भूमाफिया आणि वेगवेगळ्या उद्योगांना त्रास देणाऱ्या लोकांविरोधात एक मोहीम हाती घेऊन या सर्वांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.