बेंबळी पोलीस ठाण्याच्या पथकाने 5 सप्टेंबर 2024 रोजी धाराशिव तालुक्यातील धुत्ता पाटी येथे एका आयशर टेम्पोला अडवून त्यातून मोठ्या प्रमाणात अवैध गोवंशीय मांस जप्त केले. ही कारवाई पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली.
पोलिसांनी संशयास्पद टेम्पो थांबवून तपासणी केली असता त्यात बर्फाच्या तुकड्यांसह अंदाजे 4 मेट्रिक टन गोवंशीय मांस आढळून आले. या मांसाची किंमत अंदाजे 4,80,000 रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
टेम्पो चालक रफीक पैगंबर पठाण याच्याकडे मांस वाहतुकीसाठी आवश्यक असलेला कोणताही परवाना नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि टेम्पोसह मांस जप्त केले.
जप्त केलेल्या मांसाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच, जप्त केलेले मांस हे नाशवंत असल्याने ते नष्ट करण्यासाठी न्यायालयाची परवानगी मागण्यात आली आहे. या प्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणि संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली बेंबळी पोलीस ठाण्याचे प्रभारी पाटील, पोह- कोळेकर, पोना- जगताप, पोअं- गोपळ सोमवंशी, पवार यांच्या पथकाने केली.