धाराशिव: महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ चे कलम १४ (ज-१) चे उल्लंघन केल्याप्रकरणी बेंबळी (ता. जि. धाराशिव) ग्रामपंचायतीचे सदस्य आणि उपसरपंच नितेश उर्फ नितीन शिवाजी इंगळे यांना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी अपात्र ठरवले आहे. दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्याचा आरोप सिद्ध झाल्याने हा निर्णय देण्यात आला.
प्रकरणाची पार्श्वभूमी
याच गावातील रहिवासी सलमान सत्तार शेख यांनी ५ एप्रिल २०२१ रोजी श्री. इंगळे यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. १५ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत श्री. इंगळे हे प्रभाग क्र. ४ मधून निवडून आले होते आणि सध्या उपसरपंच म्हणून कार्यरत होते. अर्जदार श्री. शेख यांनी आरोप केला होता की, श्री. इंगळे यांना १२ सप्टेंबर २००१ नंतर तीन अपत्ये आहेत, मात्र त्यांनी निवडणूक लढवताना नामनिर्देशनपत्रात केवळ दोन अपत्ये असल्याची खोटी माहिती दिली होती.
यापूर्वी, तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी २८ जानेवारी २०२२ रोजी श्री. इंगळे यांना अपात्र ठरवले होते. या निर्णयाविरोधात श्री. इंगळे यांनी अपर विभागीय आयुक्तांकडे अपील केले होते, जिथे त्यांना दिलासा मिळाला. त्यानंतर, श्री. शेख यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने २७ जून २०२५ रोजी आयुक्तांचा निर्णय रद्द करून हे प्रकरण नव्याने सुनावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले आणि १५ जुलै २०२५ पूर्वी निर्णय देण्याचे निर्देश दिले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद
अर्जदार श्री. शेख यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, श्री. इंगळे यांनी निवडणूक अर्जात श्रेया (जन्म: ०७/०८/२००६) आणि हर्ष (जन्म: ११/०५/२००८) या दोनच मुलांची माहिती दिली. मात्र, त्यांना राजवर्धन (जन्म: ०५/११/२००९) नावाचे तिसरे अपत्य असून, ही माहिती त्यांनी जाणीवपूर्वक लपवली. तिन्ही मुले धाराशिव (उस्मानाबाद ) येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत असल्याचेही त्यांनी सांगितले.
गैरअर्जदार श्री. इंगळे यांच्या वकिलांनी हे आरोप फेटाळले. त्यांनी सादर केलेल्या जन्म दाखल्यात तिसऱ्या मुलाच्या आईचे नाव ‘संजना’ असल्याचे नमूद आहे, तर श्री. इंगळे यांच्या पत्नीचे नाव ‘विद्या’ आहे, असा युक्तिवाद केला. तसेच, शाळेच्या नोंदींमध्येही विसंगती असल्याचा दावा त्यांनी केला आणि सार्वजनिक (नगरपालिका) नोंदी या शाळेच्या नोंदींपेक्षा अधिक ग्राह्य धरल्या पाहिजेत, यासाठी विविध न्यायालयीन निकालांचे दाखले दिले.
जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे आणि सादर केलेले पुरावे तपासले. पोद्दार इंटरनॅशनल स्कूलकडून प्राप्त झालेल्या कागदपत्रांनुसार, राज नितेश इंगळे, हर्ष नितेश इंगळे आणि श्रेया नितेश इंगळे या तिन्ही मुलांच्या प्रवेश अर्जावर वडिलांचे नाव ‘इंगळे नितेश शिवाजी’ आणि आईचे नाव ‘विद्या नितेश इंगळे’ असे स्पष्टपणे नमूद आहे. शाळेच्या जनरल रजिस्टरमध्येही राज नितेश इंगळे याची जन्मतारीख ०५/११/२००९ आणि आईचे नाव विद्या असे नोंदवलेले आहे.
श्री. इंगळे यांनी स्वतः नामनिर्देशन पत्रासोबत दिलेल्या शपथपत्रात ‘नितेश शिवाजी इंगळे’ आणि ‘नितीन शिवाजी इंगळे’ ही दोन्ही नावे आपलीच असल्याचे मान्य केले होते. या सर्व पुराव्यांच्या आधारे, श्री. इंगळे यांना एकूण तीन अपत्ये असल्याचे निष्पन्न झाले. तिसऱ्या अपत्याचा जन्म १२ सप्टेंबर २००१ नंतरचा असल्याने, ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरतात, असा निष्कर्ष जिल्हाधिकाऱ्यांनी काढला.
यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी श्री. सलमान शेख यांचा अर्ज मंजूर करून श्री. नितेश उर्फ नितीन शिवाजी इंगळे यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश दिला.