बेंबळी – धाराशिव तालुक्यातील बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. दोन महिलांना त्यांच्या झोपडीतून ओढत नेत मारहाण करून त्यांच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि त्यानंतर त्यांची झोपडी पेटवून देण्यात आली. ही अत्यंत संतापजनक व धक्कादायक घटना मंगळवारी, ८ एप्रिल रोजी मध्यरात्री घडली. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून गावातीलच तीन तरुणांविरुद्ध बेंबळी पोलीस ठाण्यात अत्यंत गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलांची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास (०१:३० वा.) दोन महिला त्यांच्या झोपडीत झोपलेल्या होत्या. यावेळी गावातीलच तीन तरुण तेथे आले. त्यांनी दोन्ही महिलांना झोपडीतून बाहेर ओढून बाजूच्या शेतात नेले. तिथे त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला.या अमानुष कृत्यानंतर आरोपींनी पीडित महिलांच्या झोपडीला आग लावून ती पेटवून दिली. या घटनेने परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
याप्रकरणी एका पीडित महिलेने ८ एप्रिल रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी या फिर्यादीवरून गावातील तीन तरुणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७०(१) (सामूहिक लैंगिक अत्याचार), ३२६ (ग) (आग लावून नुकसान करणे), ११५(२) (दुखापत पोहोचवणे) व ३(५) तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(१) (W) (i)(ii) व ३(२)(v) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.आरोपींचा शोध सुरू असून, पुढील तपास बेंबळी पोलीस करत आहेत.