भूम – तालुक्यातील ईडा येथे एका घरावर परंडा पोलिसांनी छापा मारून 85 किलो गांजा जप्त करून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ईडा गाव दुर्गम भागात वसलेले आहे आणि याचाच फायदा घेवून आरोपी गांजा विक्रीचा व्यवसाय करुन त्यातुन पैसा कमवित होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
परंडा पोलीस ठाणे पोलीसांना दिनांक.24.12.2023 रोजी मौजे ईडा ता. भुम. येथे संतोष संजय जाधव या व्यक्तीने फार मोठ्या प्रमाणात गांजाची साठवणूक केलेली आहे. अशी गोपनिय माहिती प्राप्त झाली. गोपनीय माहितीबाबत वरिष्ठांना कळवून मौजे ईडा येथे सदरील व्यक्तीच्या घरी शहानिशा करण्याच्या उद्देशाने गेले असता सदरील घर बंद असुन दरवाज्याला कुलूप लावलेले आढळून आले.
सदरील घर हे नमुद आरोपी संतोष संजय जाधव यांचेच असल्याबाबत पोलीस पाटील यांना विचारुन खात्री केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी महसुल विभागाचे प्रतिनिधी , वजन मापे निरीक्षक, दोन शासकीय पंच यांना सोबत घेवून सदरील घरावरती घर मालकाच्या नातेवाईकांचे समक्ष छापा टाकण्यात आला. सदरील छाप्याच्या दरम्यान घरामध्ये 12,80,490 इतक्या रकमेचा एकुण 85 किलो 366 ग्रॅम एवढ्या वजनाचा गांजा या वनस्पतीचे पान, बोंड आणि बिया यांचा समावेश आसलेले गुंगीकारक नशेसाठी वापरल्या जाणारा गांजा आढळून आला. घराची सखोल तपासणी करुन सदरील गांजा शासकीय पंचाच्या समक्ष जप्त करण्यात आला.
ईडा हे गाव पोलीस स्टेशन परंडा अंतर्गत येते, तथापि पोलीस स्टेशन परंडापासून ईडा हे गाव अंदाजे 25 किलोमीटर लांबीवर असुन अत्यंत दुर्गम भागात वसलेले आहे आणि याचाच फायदा घेवून आरोपी संतोष संजय जाधव यांनी गांजा विक्रीचा व्यवसाय करुन त्यातुन पैसा कमवित होता आणि तरुण पिढीला नशेच्या खाईत ढकलीत होता. परंतु परंडा पोलिसांनी आपल्या गोपनीय यंत्रणेला सक्रिय करुन त्याच्याबाबत माहिती मिळवली आणि त्याच्यावर कारवाई करण्यामध्ये यशस्वी झाले. सदरील प्रकरणात पोलीस स्टेशन परंडा येथे गुरनं 285/2023 कलम 8(क), 20(ब)ii(क), कलम 29 गुंगीकारक औषधी द्रव व मनोव्यापारावर परिणाम करणारे अधिनियम 1985 अंतर्गत सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता मुसळे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार करीत आहेत. सदरील गुन्ह्यामध्ये घरातील राहणाऱ्या सर्व पाचही लोकांना आरोपी करण्यात आलेले असुन आरोपींचे नाव- संजय रामदास जाधव, बायडाबाई संजय जाधव, सुजराबाई रामदास जाधव, संतोष संजय जाधव आणि पुजा संतोष जाधव असे आहेत.