भूम: शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि पान मसाला चोरट्या मार्गाने विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर भूम पोलिसांनी कारवाई केली आहे. तालुक्यातील उळुप येथील एका किराणा दुकानावर छापा टाकून पोलिसांनी ४,२९८ रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला असून, एका ६६ वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
भूम पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, उळुप (ता. भूम) येथील ‘त्रिमुर्ती किराणा अँड जनरल स्टोअर्स’ या दुकानात अवैध गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे समजले. त्यावरून पोलिसांनी बुधवारी (दि. २९) सायंकाळी ६:१० वाजण्याच्या सुमारास दुकानावर अचानक छापा टाकला.
या कारवाईत पोलिसांनी दुकानातून विमल पान मसाला, राजनिवास पान मसाला, आर.एम.डी. (RMD) आणि व्ही-१ तंबाखू असा आरोग्यास अपायकारक आणि शासनाने बंदी घातलेला एकूण ४,२९८ रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे.
याप्रकरणी गौतम महादेव वरळे (वय ६६ वर्षे, रा. उळुप, ता. भूम) या दुकानदारावर कारवाई करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम २६(२)(i), (२)(iv), २७(३)(डी) आणि २७(३)(इ) अन्वये भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







