तुळजापूर – तीर्थक्षेत्र तुळजापूर सध्या अवैध धंद्यांच्या विळख्यात सापडले असून, भारतीय जनता पक्षाच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे ड्रग्ज प्रकरणामुळे पक्षाची प्रतिमा डागाळलेली असतानाच, आता मटका बुकी चालवणाऱ्या रॅकेटमध्येही भाजपच्याच स्थानिक कार्यकर्त्यांची नावे चव्हाट्यावर आल्याने स्थानिक राजकारण ढवळून निघाले आहे. विशेष म्हणजे, हे सर्व कार्यकर्ते स्थानिक आमदार राणा पाटील यांचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जात असल्याने आमदारांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ड्रग्जचे डाग ताजे असतानाच मटक्याचा फटका!
ड्रग्ज प्रकरण उघडकीस येऊन दोन महिने लोटले तरी अद्याप एकाही संबंधित कार्यकर्त्यावर पक्षाकडून हकालपट्टीची कारवाई झालेली नाही. माजी नगराध्यक्ष अर्चना गंगणे यांचे पती विनोद गंगणे, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापू कणे, संतोष कदम-परमेश्वर (माजी नगराध्यक्ष), माजी सभापती शरद रामकृष्ण जमदाडे आणि माजी सभापतींचा मुलगा विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे यांसारख्या भाजपशी संबंधित व्यक्तींची नावे या प्रकरणात समोर आली आहेत. हे सर्वजण आमदार राणा पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जातात. या गंभीर प्रकरणानंतरही पक्षाने घेतलेली बोटचेपी भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे. “या ‘कार्यकर्त्यां’ची पक्षातून हकालपट्टी केव्हा होणार? नवे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यावर काय कारवाई करणार की त्यांनाही अभय मिळणार?” असे संतप्त सवाल आता सामान्य नागरिक विचारू लागले आहेत.
हे कमी होते की काय, म्हणून आता मटका बुकी प्रकरणातही भाजप कार्यकर्त्यांचाच बोलबाला असल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ड्रग्ज प्रकरणातील दीड महिन्यापासून फरार असलेला आरोपी आणि माजी नगराध्यक्ष अर्चना गंगणे हिचा पती विनोद गंगणे हाच तुळजापुरात मटक्याची मोठी बुकी चालवत असल्याचे समोर आले आहे. त्याच्या साथीला भाजपचे बाजार समितीचे माजी सभापती सचिन पाटील आणि भाजपचेच चैतन्य मोहनराव शिंदे हेदेखील मटक्याचे मालक असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांच्या कारवाईने रॅकेट उघड
दोन दिवसापूर्वी पोलिसांनी तुळजापूर शहरातील राज पॅलेस-मलबा हाईटस परिसरातील एका फ्लॅटवर छापा टाकून मोठ्या ऑनलाइन मटका अड्ड्याचा पर्दाफाश केला होता. या कारवाईत १ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत ३३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान, विक्रम नाईकवाडी या मुख्य आरोपीने दिलेल्या कबुलीजबाबातून या मटका बुकीचे मालक म्हणून विनोद गंगणे (भाजप), सचिन पाटील (माजी सभापती, भाजप), चैतन्य मोहनराव शिंदे (भाजप) आणि अमोल कुतवळ (काँग्रेस) यांची नावे समोर आली. या रॅकेटचे जाळे आंतरजिल्हा पातळीवर पसरले असल्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे.
भाजपची डोकेदुखी वाढली
एकापाठोपाठ एक अवैध धंद्यांमध्ये भाजप कार्यकर्त्यांची नावे समोर येत असल्याने पक्षाच्या प्रतिमेला मोठा तडा गेला आहे. एकीकडे शुचिर्भूत राजकारणाच्या गप्पा मारणाऱ्या पक्षाचे कार्यकर्तेच जर अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सापडत असतील, तर पक्षाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे. आमदार राणा पाटील या “खड्यांना” पक्षातून दूर सारणार का, की त्यांना पाठीशी घालणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. या प्रकरणामुळे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्यासमोरील आव्हानेही वाढली आहेत. ते या ‘घरच्या भेद्यां’वर काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अन्यथा, भाजपची ही बदनामी पक्षाला आगामी काळात चांगलीच महागात पडू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.