वाशी – वाशी तालुक्यातील शेंडी शिवार येथे बोलेरो जीपने जोरदार धडक देऊन पती-पत्नींना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा अपघात नसून ठार मारण्याच्या उद्देशानेच घडवण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ज्ञानेश गोविंद मोरे (रा. गिरवी, ता. माळशीरस, जि. सोलापूर) याने 27 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास शेंडी शिवारातील हॉटेल रानवारा समोर ही घटना घडवली. फिर्यादी अविनाश सूर्यभान डोरले (वय 48, रा. तांदुळवाडी, ता. वाशी, जि. धाराशिव) आणि त्यांची पत्नी हे पारगाव येथून तांदुळवाडीला जात असताना आरोपीने त्याच्या ताब्यातील बोलेरो जीप (एमएच 45 एन 1972) भरधाव वेगाने चालवत समोरून धडक दिली.
ही धडक एवढी जबरदस्त होती की, फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीला गंभीर जखमा झाल्या. हा अपघात नसून, आरोपीच्या पत्नी मनिषा ज्ञानेश मोरे हिच्यासोबत झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जाणीवपूर्वक हा हल्ला करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी फिर्यादी अविनाश डोरले यांनी 28 फेब्रुवारी 2025 रोजी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भा.न्या.सं.कलम109, 118(2), 118(1)अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.