धाराशिव – तालुक्यातील केशेगाव येथे एका आर्थिक व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर ५५ वर्षीय पुरुषाला किडनॅप करून अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असून, आरोपी सध्या फरार आहेत.
मयत व्यक्तीचे नाव मधुकर चंदर कोळगे (वय ५५, रा. केशेगाव) असे असून, त्यांच्या मृतदेहावर जबर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या आहेत. कोळगे यांच्या संपूर्ण शरीरावर काळे-निळे व्रण दिसून येत आहेत.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुकर कोळगे यांना आर्थिक देवाण-घेवाणीच्या कारणावरून एका व्यक्तीने ७ ते ८ महिन्यांपासून शेतात जबरदस्तीने डांबून ठेवले होते. व्याजासह पैसे वसूल करूनही त्यांच्याकडून मजुरी करून घेतली जात होती, असा आरोप कोळगे यांचा मुलगा मारुती कोळगे यांनी केला आहे.
दरम्यान, कोळगे यांना मारहाण केल्यानंतर त्यांना एका इसमाने थेट शासकीय रुग्णालयात आणून टाकले आणि त्यांच्या मुलाला फोन करून “तुमचे वडील गंभीर आजारी आहेत, रुग्णालयात या” असे सांगितले. मात्र, त्यापूर्वीच कोळगे यांचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणामुळे गावात खळबळ उडाली असून, कोळगे यांचा मृतदेह पाहण्यासाठी आणि नातेवाईकांना धीर देण्यासाठी शासकीय रुग्णालयात गावकऱ्यांची गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनेची नोंद घेण्यास सुरुवात केली असून आरोपींच्या शोधासाठी तपास सुरू आहे.