वाशी: वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीची घटना घडली असून, अज्ञात चोरट्यांनी 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. हनुमान नाना हुंबे (वय 35) यांच्या राहत्या घरात ही चोरी झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुंबे यांच्या घरातील लोखंडी गेटची कडी तोडून चोरटे आत शिरले. घरातील 12 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 30 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 70 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
या घटनेची तक्रार हनुमान हुंबे यांनी वाशी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध सुरू आहे.
चोरीची घटना 14 फेब्रुवारीच्या रात्री 10.30 ते 15 फेब्रुवारीच्या पहाटे 2.45 च्या दरम्यान घडली. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 331 (4), 305 (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ढोकी येथील सोलर प्रकल्पातून 70 हजारांची वायर चोरी
ढोकी : ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सोलर ऊर्जा प्रकल्पातून सुमारे 70 हजार रुपये किमतीची वायर चोरीला गेली आहे. हा प्रकार 14 फेब्रुवारीच्या सायंकाळपासून 15 फेब्रुवारीच्या सकाळपर्यंतच्या वेळेत घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढोकी शिवारातील माळरान येथे व्ही.एम.आर. ग्रीन एनर्जी प्रा.लि. ढोकी यांचा सोलर प्रकल्प आहे. या प्रकल्पात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी 15 फेब्रुवारी रोजी सकाळी पाहणी केली असता, पाच इनव्हर्टर आणि तीन मॉडेल टेबलची केबल वायर गायब असल्याचे निदर्शनास आले. अज्ञात चोरट्यांनी सुमारे 2,500 मीटर वायर चोरून नेल्याचा अंदाज आहे, ज्याची किंमत 70 हजार रुपये इतकी आहे.
या प्रकरणी अभिजीत अनिल कोकाटे (वय 22) यांनी ढोकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल
धाराशिव: येथील साळुंखे नगरमध्ये राहणारे वैभव सुरेश पाटील (वय २६) यांची होंडा शाईन मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. 4 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 8 ते 6 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 7 या वेळेत ही मोटरसायकल जिल्हा परिषद क्वार्टर जवळच्या विसर्जन विहिरीतून अज्ञात व्यक्तीने चोरून नेली.
या प्रकरणी वैभव पाटील यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात 15 फेब्रुवारी 2025 रोजी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 303 (2) अन्वये गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.