तुळजापूर – तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या तब्बल १० हजार ७४४ पानी दोषारोपपत्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. यातील सर्वात खळबळजनक खुलासा म्हणजे, पोलिसांनी ‘व्यसनी’ म्हणून गणलेल्या आरोपी विनोद उर्फ पिंटू गंगणे याने केवळ एका दिवसात तब्बल १ लाख २५ हजार रुपयांचे ड्रग्ज खरेदी केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, हे व्यवहार अत्यंत शांत डोक्याने आणि स्वतःचा माग लागू नये यासाठी जवळच्या नातेवाईक आणि मित्रांच्या फोन पे खात्यांचा वापर करून करण्यात आले आहेत.
सव्वा लाखाची ड्रग्ज खरेदी आणि मोडस ऑपरेंडी:
दोषारोपपत्रातील जबाबांनुसार, विनोद गंगणे याने २५ ऑगस्ट २०२४ रोजी त्याच्या नात्यातील दोन व्यक्तींना मुंबईतील ड्रग्ज तस्करांच्या खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले आणि त्यांना ती रक्कम रोख स्वरूपात दिली. एका व्यक्तीकडून त्याने एकाच दिवशी ४० हजार, ४५ हजार आणि २० हजार असे एकूण १ लाख ५ हजार रुपये पाठवायला लावले. त्याच दिवशी एका व्यापारी मित्राला २० हजार रुपये पाठवण्यास सांगून, एका दिवसात एकूण १ लाख २५ हजार रुपये ड्रग्ज तस्करांना पोहोचवले. इतकेच नव्हे, तर ३० सप्टेंबर २०२४ रोजी भाऊ विजय गंगणे यांच्या खात्यावरून १८ हजार रुपये ड्रग्ज तस्कराला पाठवले (ज्याबद्दल विजय गंगणे यांनी, समाजसेवा म्हणून पैसे पाठवले असावेत असे समजून पाठवल्याचे जबाबात म्हटले आहे). गंगणे मुंबईतील तस्करांच्या थेट संपर्कात असल्याचे पुरावेही असल्याचे समजते.
‘व्यसनी’ गंगणे आणि ‘तस्कर’ इतर?
पोलिसांनी ३६ पैकी २६ आरोपींना ‘ड्रग्ज तस्कर’ आणि १० जणांना ‘व्यसनी’ ठरवले आहे. विनोद गंगणे याचा समावेश ‘व्यसनी’ गटात आहे. मात्र, एका दिवसात सव्वा लाखाचे ड्रग्ज (प्रति ग्रॅम ३ ते ५ हजार दरानुसार अंदाजे २५ ते ४० पुड्या) खरेदी करणे, त्यासाठी इतरांच्या खात्यांचा वापर करणे, पुरावा मागे राहू नये यासाठी शांत डोक्याने कट रचणे (Cold Blooded Crime) – या सर्व बाबी पाहता, इतकी मोठी खरेदी केवळ व्यसनासाठी होती की विक्रीसाठी? आणि इतका थंड डोक्याने गुन्हा करणारा केवळ ‘व्यसनी’ कसा? असे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. हा ड्रग्ज साठा तुळजापूरपर्यंत कसा आणि कोणी आणला, हा देखील तपासाचा विषय आहे. ज्यांच्या खात्यांचा वापर झाला, त्यांना साक्षीदार बनवण्यात आले असून, त्यांचे जबाब हे एकमेकांशी मिळतेजुळते (कॉपी-पेस्ट केल्यासारखे) असल्याचीही चर्चा आहे.
पश्चाताप, इन्फॉर्मर आणि प्रश्नचिन्ह:
एक कथा अशीही सांगितली जात आहे की, गंगणे व्यसनमुक्त झाल्यावर (आमदार राणा पाटील यांच्या मदतीने उपचार घेतल्यानंतर) त्याला पश्चात्ताप झाला आणि त्याने पोलिसांना टीप देऊन आरोपींना पकडायला मदत केली. यासाठी त्याने आधी जानेवारी २०२५ मध्ये स्वतःच्या खात्यावरून ६ वेळा व्यवहार करत ९५ हजार रुपये पाठवून तस्करांचा विश्वास जिंकला. आमदार पाटील यांनीही “माहिती देणाऱ्याबद्दल आदर ठेवावा, ही साधी गोष्ट नाही,” असे विधान केले होते. मात्र, जरी त्याने नंतर मदत केली असली, तरी त्याने यापूर्वी केलेल्या गंभीर गुन्ह्यांचे काय? एका दिवसात सव्वा लाखाचे ड्रग्ज खरेदी करणे आणि इतरांना कटात ओढणे, हे गुन्हे माफ होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तस्कर आणि व्यसनी गट:
दोषारोपपत्रात मुंबईतील संगीता गोळे, वैभव गोळे, संतोष खोत यांच्यासह अमित आरगडे, पिंटू मुळे, बापू कर्णे, संतोष कदम परमेश्वर, उदय शेटे अशा २६ जणांना ‘तस्कर’ म्हटले आहे. तर, विनोद गंगणे, माजी सभापती शरद जमधाडे, आबासाहेब पवार, अलोक शिंदे, शाम भोसले अशा १० जणांना ‘व्यसनी’ गटात टाकण्यात आले आहे.
एकंदरीत, दोषारोपत्रातील तपशील आणि आरोपींचे वर्गीकरण यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून, विनोद गंगणे याची ‘व्यसनी’ म्हणून असलेली ओळख आणि त्याचे कथित व्यवहार यातील तफावत प्रकरणाला नवे वळण देत आहे.