तुळजापूर: “पोलिसांनी आमच्यावर अन्याय केला आहे. आमची जमीन बळकावणाऱ्या गुंडांना पोलिसांचा पाठिंबा आहे,” असा गंभीर आरोप करत सचिन प्रभाकर ठोंबरे पाटील या शेतकऱ्याने कुटुंबासह तुळजापूर छत्रपती शिवाजी चौकात उपोषण सुरू केले आहे.
ठोंबरे पाटील यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मालकीच्या शेतात पवनचक्की कंपनीने अतिक्रमण करून पवनचक्की उभारली आहे. त्यांनी याबाबत तक्रार केली असता, पोलिसांनी दखल घेतली नाही. उलट, त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना पाठिंबा दिला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
पोलिसांवर कारवाईची मागणी:
ठोंबरे पाटील यांनी पोलीस निरीक्षक रविंद्र खांडेकर, बीट अंमलदार पांडुरंग फुलसुंदर आणि ज्ञानेश्वर पोपलायत यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. “हे तिघेही आरोपींना पाठीशी घालत आहेत. त्यांची तात्काळ बदली करूनत्यांना निलंबित करावे, ,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
अतिरिक्त पोलिस अधीक्षकांची भेट:
या घटनेची दखल घेत अतिरिक्त पोलीस अधीक्षक गौहर हसन यांनी उपोषणस्थळी भेट देऊन शेतकऱ्याची बाजू ऐकली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
मुख्यमंत्री आणि आमदारांना निवेदन:
दरम्यान, ठोंबरे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याबाबत निवेदन पाठवले आहे.आ. राणा पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन शेतकऱ्याची बाजू ऐकून घेतली.
जमिनीचा वाद:
ठोंबरे पाटील यांच्या आईने मे. एस. डब्ल्यू. कंपनीला पवनचक्कीसाठी २० गुंठे जमीन भाडेतत्वावर दिली होती. मात्र, कंपनीने ३० ते ३५ गुंठे जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप ठोंबरे पाटील यांनी केला आहे. याबाबत त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आणि काही गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
पोलिसांची भूमिका संशयास्पद:
या प्रकरणी पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. उलट, पोलिसांनी आरोपींना पाठिंबा दिला असल्याचा आरोप ठोंबरे पाटील यांनी केला आहे. पोलिसांची ही भूमिका संशयास्पद असल्याने या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
ठोंबरे पाटील यांनी आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कोणती भूमिका घेतली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.