धाराशिव: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सातत्याने भेडसावणाऱ्या अनियमित वीजपुरवठा आणि लोडशेडिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. आशियाई विकास बँकेच्या (ADB) माध्यमातून जिल्ह्यात २४ नवीन वीज उपकेंद्रांच्या उभारणीला लवकरच मंजुरी मिळणार आहे. यासोबतच, आणखी ४२ उपकेंद्रांची क्षमतावाढ करण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील विजेचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
वाढती विजेची मागणी, वारंवार खंडित होणारा पुरवठा आणि ऐन हंगामात शेतकऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेता, खा. राजेनिंबाळकर यांनी विविध योजनांमधून वीज यंत्रणा सक्षम करण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आशियाई विकास बँकेने २४ नवीन ३३/११ के.व्ही. उपकेंद्रांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
या ठिकाणी होणार नवीन उपकेंद्रे:
- धाराशिव तालुका: पळसप, दारफळ, भडाचीवाडी (वरुडा चौक), गोगाव-करजखेडा
- तुळजापूर तालुका: ढेकरी, वडगाव (काटी), नवीन तामलवाडी, कार्ला, खंडाळा
- लोहारा तालुका: तुगाव, वडगाव (गांजा), खेड
- उमरगा तालुका: नाईचाकुर, कुन्हाळी, कराळी
- भूम तालुका: गिरवली फाटा, वंजारवाडी, नळीवडगाव
- कळंब तालुका: नायगाव, खोंदला, चोराखळी
- परांडा तालुका: खासापुरी, ताकमोडवाडी, जवळा
४२ उपकेंद्रांची क्षमता वाढणार
नवीन उपकेंद्रांच्या उभारणीसोबतच, जिल्ह्यातील सध्याच्या ४२ उपकेंद्रांची क्षमता वाढवण्यात येणार आहे.
- ए.डी.बी. अंतर्गत २० उपकेंद्रे: आशियाई विकास बँकेच्याच माध्यमातून २० उपकेंद्रांमध्ये अतिरिक्त ५ एम.व्ही.ए. क्षमतेचे पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवून त्यांची क्षमता वाढवली जाईल. यामध्ये तुळजापूर, उमरगा, भूम, वाशी, परांडा, कळंब आणि धाराशिव तालुक्यातील विविध उपकेंद्रांचा समावेश आहे.
- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत २२ उपकेंद्रे: या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २२ ठिकाणी अतिरिक्त ५ एम.व्ही.ए. क्षमतेचे पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. यामध्ये तुळजापूर आणि धाराशिव विभागातील मंगरुळ, मुरुम, गुंजोटी, वाशी, भूम, येडशी, देवळाली यांसारख्या ठिकाणच्या उपकेंद्रांचा समावेश आहे.
या सर्वंकष कामांमुळे जिल्ह्यातील विजेच्या पायाभूत सुविधा अधिक मजबूत होणार असून, शेतकऱ्यांना शेतीसाठी सुरळीत आणि नियमित वीजपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.