धाराशिव: मंडळी, ऐकलंत का? आपल्या धाराशिव जिल्ह्यात म्हणे यंदा तब्बल ५० लक्ष झाडं लावण्याचा ‘विक्रमी’ कार्यक्रम हाती घेतलाय प्रशासनानं! आणि त्यातला ‘मास्टरस्ट्रोक’ म्हणजे येत्या १९ जुलैला एकाच दिवशी २० लक्ष रोपं लावणार! अहो, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार साहेबांनी तर सगळ्या नोडल अधिकाऱ्यांना वेळेत कामाला लागायचे सज्जड दमच भरलेत. बैठकांवर बैठका, अधिकाऱ्यांची फौज आणि आकड्यांची आतषबाजी… सगळं कसं एकदम ‘टॉप लेव्हल’!
‘इव्हेंट’बाजीची परंपरा आणि डिग्गीचा धडा
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत काय दिव्ये लागले असतील, याची कल्पनाच केलेली बरी. जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. मैनाक घोष यांच्यापासून ते थेट पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांपर्यंत सगळ्यांची मांदियाळी. पुजार साहेबांनी ग्रामीण, शहरी भाग, मोकळ्या जागा, शाळा परिसर, साखर कारखान्यांचे क्षेत्र असं काही सोडलंच नाहीये वृक्षारोपणासाठी. १९ जुलैला ६२ हेक्टरवर २० लक्ष झाडं लावायचं नियोजन पण ‘रेडी’ आहे म्हणे! गावपातळीवर प्रत्येक गावातून ३०० लोकं पण सामील होणार… क्या बात है! सहा महिन्यांनी आढावाही घेणार आहेत म्हणे. व्वा! सगळं कसं चकचकीत!
पण मंडळी, थांबा! ही बातमी वाचून टाळ्या पिटण्याआधी जरा थांबूया. ही असली ‘आकड्यांची शेती’ आपण यापूर्वीही पाहिली आहे. डिग्गी (ता. उमरगा) आठवतंय? तिथे अडीच एकर माळरानावर मनापासून वृक्षारोपण करून त्याची निगराणी काय असते, हे दाखवून दिलंय. तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मॅडमनी स्वतः येऊन लावलेला आंब्याचा वृक्ष आजही त्या कामाची साक्ष देतोय. सांगायचा मुद्दा हाच की, नुसते ‘इव्हेंट’ नकोत, झाडं जगली पाहिजेत!
जनतेचे सवाल: हिशेब कोण देणार?
आता खरा प्रश्न. आजपर्यंत लावलेल्या झाडांपैकी किती जगली, याचा हिशेब कोण देणार? ‘झाडे लावा, झाडे जगवा’ ही योजना फक्त कागदोपत्रीच हिरवीगार दिसतेय का? झाडं लावल्यावर त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं जात नाही, ही ओरड काही खोटी नाही. त्यामुळेच प्रशासनाच्या अशा घोषणांवर लोकांचा विश्वास उडालाय. याला ‘कागदी घोडे’ नाचवणं नाहीतर काय म्हणायचं?
आणि हो, ते एक राजकीय नेते आठवतात का? निवडून आल्यावर ‘जितकी मतं, तितकी झाडं लावणार’ म्हणाले होते. आज सहा वर्षं झाली, ती झाडं कुठल्या जंगलात लपलीयेत, हे त्यांनाच माहिती!
दुष्काळी धाराशिव आणि ‘सोपस्कार’ बैठका
धाराशिव जिल्हा दुष्काळी. उन्हाळ्यात घोटभर पाण्यासाठी वणवण होते. झाडं लावली म्हणजे पाऊस पडतो, हा संदेश चांगला आहे. पण त्यासाठी झाडं फक्त ‘लावली’ म्हणून चालत नाही, ती ‘जगवावी’ लागतात. पण खरी आकडेवारी काय? ‘जलयुक्त शिवार’च्या धर्तीवर ‘जलतारा’ प्रकल्प आणि अतिक्रमित रस्ते मोकळे करण्याच्या सूचना… हे सगळं ऐकायला छान वाटतं. पण या बैठका म्हणजे केवळ ‘सोपस्कार’ तर नाहीत ना, अशी शंका सामान्य माणसाच्या मनात आल्याशिवाय राहत नाही.
शेवटी काय?
तर, धाराशिवकरांनो, तयार रहा! आणखी एका ‘महावृक्षारोपण सोहळ्या’साठी! फक्त यावेळेस लावलेल्या रोपट्यांना सहा महिन्यांनी जाऊन ‘कसा आहेस बाळा?’ विचारायला विसरू नका. नाहीतर नेहमीप्रमाणे ‘आकडे हिरवे, जमीन भकास’ अशीच परिस्थिती राहील, आणि आपण फक्त जुन्या बातम्यांचे नवे ‘पंचनामे’ करत बसू!