जिल्हाधिकारी डॉ. कीर्ती किरण पुजार यांनी वादग्रस्त तुळजाई कला केंद्राचा परवाना कायमचा रद्द करून कायद्याच्या राज्याचा जो सन्मान राखला आहे, तो निश्चितच स्वागतार्ह आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांच्या पाठपुराव्याला आणि पोलिसांच्या निःपक्ष अहवालाला मिळालेला हा विजय आहे. एका अर्थाने, हा एका राक्षसाचा वध आहे, पण आसुरी वृत्तीचा नायनाट नाही. कारण एक तुळजाई बंद होत असताना, जिल्ह्यात अजूनही पाच अशाच ‘सांस्कृतिक’ केंद्रांचा धिंगाणा सुरू आहे आणि आणखी आठ केंद्रे परवानगीच्या रांगेत आहेत. त्यामुळे खरा प्रश्न हा आहे की, प्रशासन केवळ एका केंद्रावर कारवाई करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणार आहे की या ‘सांस्कृतिक’ प्रदूषणाचे समूळ उच्चाटन करणार आहे?
आजही जिल्ह्यातील इतर पाच कला केंद्रांमध्ये लोककलेच्या नावाखाली काय चालते, हे जगजाहीर आहे. तिथे पारंपरिक वाद्यांचा सूर नाही, तर कानठळ्या बसवणाऱ्या डीजेचा धांगडधिंगा आहे. तिथे कलेचा आदर नाही, तर कलावतीवर पैशांची उधळपट्टी करत चाललेला अश्लील चाळे आहेत. मद्याचे पाट वाहत आहेत आणि रात्री एकची वेळमर्यादा सर्रास पायदळी तुडवली जात आहे. मग स्थानिक पोलीस आणि प्रशासनाच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आहे का? की ‘अर्थपूर्ण’ हप्त्यांच्या वजनाखाली त्यांचे डोळे आपोआप मिटले जात आहेत? हे सर्व अवैध प्रकार अधिकृत यंत्रणांना दिसत नसतील, यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. या शांततेमागे ‘हप्तेखोरी’ची मोठी साखळी कार्यरत असल्याचा आरोप जर नागरिक करत असतील, तर त्यात चुकीचे काय?
तुळजाई प्रकरणाने एक धडा शिकवला आहे: अशा केंद्रांना दिलेली परवानगी ही केवळ मनोरंजनाचा परवाना नसतो, तर तो सामाजिक स्वास्थ्य आणि कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा परवाना ठरतो. असे असताना, आणखी आठ केंद्रांचे अर्ज प्रशासनाकडे मंजुरीसाठी पडून आहेत, हे धक्कादायक आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तुळजाई केंद्राचा अर्ज फेटाळून जी खंबीर भूमिका घेतली, तीच भूमिका या आठ अर्जांच्या बाबतीतही घेणे अपेक्षित आहे. या आठही अर्जांना केराची टोपली दाखवणे, हाच खरा न्याय ठरेल.
केवळ एका केंद्रावरील कारवाईने ही लढाई संपलेली नाही. ही तर फक्त सुरुवात आहे. आता गरज आहे ती उर्वरित पाच केंद्रांवर धाडसत्र राबवून त्यांच्यावरही कायद्याचा बडगा उगारण्याची आणि भविष्यात अशा केंद्रांना थारा न देण्याची. धाराशिवला विकासाची गरज आहे, विनाशाच्या या ‘केंद्रां’ची नाही. जिल्हा प्रशासनाने आता केवळ एका फांदीवर नाही, तर या विषवृक्षाच्या मुळावरच घाव घालण्याची हिंमत दाखवावी, हीच जनतेची अपेक्षा आहे.
– सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह