धाराशिव – येथील घाटंग्री येथील चार जणांनी एका महिलेला आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड व दगडाने मारहाण करून हात फ्रॅक्चर केल्याची घटना घडली आहे. जिवे मारण्याची धमकीही त्यांनी दिली. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमित सुखदेव राठोड, अक्षय सुखदेव राठोड, विशाल तुकाराम राठोड, सुखदेव गोविंद राठोड (रा. घाटंग्री) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोपट शोभा राठोड (वय ४८ वर्षे, रा. तांबेवाडी, ता. बार्शी, जि. सोलापूर) या पीडित महिला आहेत.
दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ४.३० वाजता आरोपींनी आर्थिक व्यवहारावरून पोपट राठोड यांना शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड व दगडाने मारहाण करून त्यांचा हात फ्रॅक्चर केला. यावेळी आरोपींनी त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर पोपट राठोड यांनी दि. १७ डिसेंबर २०२४ रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भा.न्या.सं. कलम ११८(१), ११७(२) (३) (४), ११५(२), ३५२, ३५१(२) (३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.