धाराशिव : जिल्ह्यात गोवंशीय जनावरांच्या मांसाची बेकायदेशीर साठवण आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुरुवारी मोठी कारवाई केली. उमरगा, बेंबळी आणि धाराशिव पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या स्वतंत्र कारवायांत संशयित गोमांसासह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उमरगा शहरातील मुन्शी प्लॉट परिसरात फिरोज कुरेशी याच्याकडे विक्रीच्या उद्देशाने ठेवलेले सुमारे ७ किलो गोवंशीय जनावराचे मांस पोलिसांना आढळून आले. या मांसाची किंमत सुमारे १ हजार ४०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात कलम ५(क), ९(अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
-
आरोपी: फिरोज कुरेशी (रा. मुन्शी प्लॉट, उमरगा) हा विक्रीच्या उद्देशाने स्वतःच्या ताब्यात गोमांस बाळगताना मिळून आला.
-
जप्ती: त्याच्याकडून ७ किलो गोमांस (किंमत १४०० रुपये) जप्त करण्यात आले.
-
गुन्हा: उमरगा पोलिसांनी सरकारतर्फे आरोपीविरुद्ध कलम ५(क), ९(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
दुसऱ्या कारवाईत बेंबळी उजणी रोडवरील समाधान हॉटेलजवळ ट्रक (एमएच १८ बीए ०५१८) मधून तब्बल ७ टन संशयित गोमांस वाहतूक करताना यासीन साईबाबा शेख याला ताब्यात घेण्यात आले. पशुवैद्यक विभागाची पूर्वपरवानगी न घेता हा साठा वाहतूक केला जात असल्याचा आरोप आहे. या कारवाईत ८ लाख ४० हजार रुपयांचे संशयित गोमांस आणि वाहनासह एकूण १८ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फिर्यादी ओंकार सुधीर जाधव यांच्या तक्रारीवरून बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
-
आरोपी: यासीन साईबाबा शेख (रा. खिरणीमळा, जि. धाराशिव) याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले.
-
जप्ती: ८ लाख ४० हजार रुपयांचे गोमांस आणि ट्रक असा एकूण १८ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
-
गुन्हा: ओंकार सुधीर जाधव (वय २३, रा. अयोध्यानगर सिडको, तुळजापूर) यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध कलम ५(क), ९(ए) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
धाराशिव शहराजवळ तिसऱ्या घटनेत महिंद्रा बोलेरो पिकअप (एमएच २५ एजे ५५३५) मधून सुमारे ६०० किलो संशयित गोमांस वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले. वाहन पंक्चर झाल्यानंतर चालकाने बोलेरो तेथेच सोडून पळ काढल्याची माहिती पोलिसांनी दिली. या वाहनातून १ लाख ८ हजार रुपयांचे संशयित गोमांस आणि वाहनासह एकूण ४ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
-
जप्ती: या गाडीत पोलिसांना ६०० किलो संशयित गोमांस (किंमत १ लाख ८ हजार रुपये) आढळून आले. वाहन आणि गोमांस असा एकूण ४ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
-
गुन्हा: याप्रकरणी सरकारतर्फे अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या तिन्ही प्रकरणांत संबंधित आरोपींविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाच्या कलम ५(क), ९(अ)/९(ए) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे.







