धाराशिव जिल्ह्यातील ढोकी गावात बर्ड फ्लूचा संभाव्य संसर्ग आढळून आल्याने आरोग्य आणि पशुसंवर्धन विभाग सतर्क मोडवर आहे. कावळ्यांमध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर आता ढोकी गावातील एका मांस विक्रेत्याला तापाचे तीव्र लक्षणे आढळल्याने त्याचा स्वॅब तपासणीसाठी पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (NIV) प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे.
बर्ड फ्लूचा संशयित रुग्ण सापडला
गेल्या काही दिवसांपासून ढोकी गावातील एका मांस विक्रेत्याला तीव्र ताप होत होता. ताप उतरत नसल्याने त्याला धाराशिव शहरातील एका खाजगी रुग्णालयात २५ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले. आरोग्य विभागाने त्याच्या नमुन्यांची तपासणी सुरू केली असून बर्ड फ्लूची लागण झाली का, याचा अहवाल लवकरच स्पष्ट होईल.
कावळ्यांमध्ये आधीच बर्ड फ्लूची लागण
२१ फेब्रुवारी रोजी ढोकी गावातील पोलिस ठाण्याच्या परिसरात काही कावळे मृत अवस्थेत आढळले होते. पशुसंवर्धन विभागाने त्यांचे नमुने पुण्याला पाठवले होते. २४ फेब्रुवारी रोजी आलेल्या प्रयोगशाळेच्या अहवालात कावळ्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
ढोकी आणि आसपासच्या परिसरात अलर्ट झोन घोषित
कावळ्यांमध्ये बर्ड फ्लू आढळल्यानंतर ढोकी गावात कोंबड्यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. सध्या पशुसंवर्धन विभागाकडून १० किमी परिघातील परिसर ‘अलर्ट झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे.
आरोग्य यंत्रणा सतर्क
➡ संशयित रुग्णाच्या प्रकृतीवर सतत देखरेख ठेवली जात आहे.
➡ ढोकी गाव आणि आजूबाजूच्या परिसरात वैद्यकीय तपासणी सुरू.
➡ कोंबड्या आणि पक्ष्यांचे निरीक्षण सुरू असून सर्वेक्षण मोहिम राबवली जात आहे.
बर्ड फ्लूचा संसर्ग अधिक वाढू नये यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे आणि कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.