तुळजाभवानी मंदिर संस्थानचा कारभार म्हणजे ‘दर्शनास देव आणि नियमात तुघलक’ अशी स्थिती झाली आहे. संस्थानने 39 कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी दोन लाखांची बँक गॅरंटी घेत 78 लाखांची सक्तीने वसुली केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
नोकरीसाठी इच्छुक कर्मचाऱ्यांना थेट बँककडून कर्ज काढायला लावून ती रक्कम मंदिर संस्थानकडे गहाण ठेवण्याची सक्ती करण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर नोकरीसाठी कर्जाचा बोजा लादला जात आहे.
कर्मचाऱ्यांची आर्थिक लूट, कायद्याला हरताळ!
बँक गॅरंटीची ही सक्ती कामगार कायद्याच्या तोंडाला काळं फासणारी आहे. सरकारी मंदिर संस्थान असूनही, हे फंड कुठे जातात, कोणाच्या खिशात जातात? असा सवाल निर्माण होतो.
‘तारण’ नव्हे, ‘गहाण’ व्यवस्थापन!
कर्मचाऱ्यांच्या नोकरीच्या सुरक्षिततेपेक्षा त्यांच्या आर्थिक लुटीला प्राधान्य देणाऱ्या या व्यवस्थेचा निषेध होत आहे. प्रशासनाच्या या नव्या ‘गहाण पद्धती’ची चौकशी होणार का? हा खरा सवाल आहे!