धाराशिव: कोरोना काळात पतीचे छत्र हरपल्याने मानसिक धक्क्यातून किडनी निकामी झालेल्या बहिणीसाठी धाकटा भाऊ धावून आला आहे. स्वतःचा वाढदिवस अवघ्या काही दिवसांवर असताना, २६ जानेवारीला आपल्या शरीरातील एक किडनी बहिणीला देऊन भावाने तिला ‘पुनर्जन्म’ हीच वाढदिवसाची अनोखी भेट दिली आहे. धाराशिव येथील हरीश अनंतराव वेदपाठक (३१) आणि त्यांची बहीण प्राजक्ता भूषण महामुनी (२९) यांची ही हृदयस्पर्शी कहाणी नात्यांमधील प्रेमाची नवी मिसाल ठरली आहे.
कोरोनाचा आघात आणि बहिणीचा संघर्ष
धाराशिवमधील विकासनगर भागात राहणारे अनंतराव वेदपाठक (एसटी महामंडळ कर्मचारी) यांची मुलगी प्राजक्ता यांचा विवाह लातूर येथील भूषण महामुनी यांच्याशी झाला होता. सुखी संसार सुरू असतानाच कोरोना काळात भूषण यांचे अकाली निधन झाले. या प्रचंड मानसिक धक्क्यातून प्राजक्ता सावरू शकल्या नाहीत. अतिताण (Hypertension) वाढल्याने दीड वर्षापूर्वी त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदान झाले.
उच्चशिक्षित कुटुंबाचा आदर्श निर्णय
कुटुंबीयांनी उपचारासाठी धावपळ केली, पण किडनी प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नव्हता. अशा वेळी भाऊ हरीश वेदपाठक पुढे आले. हरीश हे पुण्यातील एका मोठ्या बांधकाम कंपनीत स्थापत्य अभियंता (Civil Engineer) असून उच्च पदावर कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, हरीश यांच्या पत्नी सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता आहेत. हरीश यांनी किडनी देण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांच्या पत्नीने आणि संपूर्ण सासरच्या-माहेरच्या लोकांनी त्यांना खंबीर पाठिंबा दिला.
प्रजासत्ताक दिनी यशस्वी शस्त्रक्रिया
हरीश यांचा ३० जानेवारीला वाढदिवस . त्यापूर्वीच २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिनी) हैदराबाद येथील रुग्णालयात ही अवघड शस्त्रक्रिया पार पडली. भावाने वाढदिवसाची वाट न पाहता, बहिणीला आधी जीवदान देण्याला प्राधान्य दिले.
भावा-बहिणीचे अतूट नाते
-
हरीश (भाऊ): यांना २ वर्षांची मुलगी आहे.
-
प्राजक्ता (बहीण): या स्वतः संगणक अभियंता (Computer Engineer) असून त्यांनी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले आहे. त्यांना ६ वर्षांचा मुलगा आहे.
या निर्णयात हरीश यांचे मोठे बंधू अभिषेक वेदपाठक (जे स्वतः स्थापत्य अभियंता आहेत) आणि संपूर्ण कुटुंबाचा मोठा वाटा आहे. “हा निर्णय घेणे कठीण होते, पण सर्वांच्या समन्वयातून आम्ही तो घेतला आणि शस्त्रक्रिया यशस्वी झाली,” अशी भावना अभिषेक वेदपाठक यांनी व्यक्त केली.







