धारशिव: राज्याचे परिवहनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात धारशिव येथील नव्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या टोलेजंग इमारतीचे १ मे रोजी उद्घाटन करण्यात आले. मात्र, हा उद्घाटन सोहळा म्हणजे केवळ एक दिखावा ठरला असून, प्रत्यक्षात प्रवाशांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार घडला आहे. उद्घाटनानंतर २४ तास उलटून गेले तरी नव्या बसस्थानकात ना वीज पोहोचली, ना फलाटावर एकही बस थांबली, त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
गेल्या दीड वर्षांपासून या बसस्थानकाच्या इमारतीचे काम रखडले होते. अनेकदा मुहूर्त हुकल्यानंतर अखेर महाराष्ट्र दिनी १ मे रोजी उद्घाटनाचा घाट घालण्यात आला. इमारत बाहेरून टोलेजंग दिसत असली तरी आत मात्र सुविधांचा पूर्ण अभाव आहे. उद्घाटनानंतर नव्या फलाटांवरून बस सुटतील, पिण्याचे पाणी मिळेल, मातांसाठी हिरकणी कक्ष सुरू होईल, अशा अपेक्षा प्रवाशांना होत्या. पण प्रत्यक्षात चित्र पूर्णपणे वेगळे आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, इमारतीचे विद्युत काम अजून अपूर्ण आहे. वायरिंग, दिवे, पंखे यांचे काम झालेले नाही कारण त्याचे टेंडरच वेळेवर निघाले नव्हते. आता टेंडर प्रक्रिया सुरू झाली असून, मे अखेरपर्यंत काम पूर्ण होईल, असे विद्युत अभियंता सांगत आहेत. तोपर्यंत हे नवे चकचकीत बसस्थानक रात्री अंधारातच राहणार आहे. परिणामी, उद्घाटनाच्या दिवशी एकही बस नव्या फलाटावरून सुटली नाही आणि आजही जुन्या बसस्थानकातूनच सर्व कारभार सुरू आहे. ऊन लागू नये म्हणून काही प्रवासी नव्या इमारतीच्या आडोशाला बसलेले दिसत होते, पण बाकी फलाट ओस पडले आहेत.
सुरक्षेचाही बोजवारा उडाला आहे. नव्या इमारतीत एकही सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आलेला नाही. जुन्या इमारतीतील कॅमेरे काढले तर वायर तुटतील, असे तकलादू कारण अधिकारी देत आहेत. याचाच अर्थ, सध्या प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे आहे.
एवढेच नव्हे, तर बसस्थानकात दोन प्रवेशद्वार असूनही एकच प्रवेशद्वार सुरू ठेवण्यात आले आहे. यामुळे बसच्या आत-बाहेर जाण्यासाठी प्रचंड वाहतूक कोंडी होत असून प्रवाशांना आणि चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
अधिकाऱ्यांकडून मात्र टोलवाटोलवी सुरू आहे. विभागीय अभियंता इमारत काम पूर्ण झाल्याचे सांगत असले तरी विद्युत आणि कँटीनचे काम बाकी असल्याचे मान्य करत आहेत. विभागीय नियंत्रक आठ दिवसांत विद्युत आणि पाण्याची सोय करण्याचे आश्वासन देत आहेत, तर विद्युत अभियंता मे अखेरची मुदत देत आहेत. कँटीनचे काम तर पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या सगळ्या गोंधळात, नवे बसस्थानक प्रत्यक्षात प्रवाशांच्या सेवेत कधी दाखल होणार, याचे ठोस उत्तर कुणाकडेच नाही.
एकंदरीत, पूर्ण सुविधांशिवाय केवळ उद्घाटनाचा सोहळा उरकून काय साधले, हा प्रश्न धारशिवकर विचारत आहेत. मंत्र्यांच्या हस्ते फीत कापून दिखावा करण्यापेक्षा प्रत्यक्ष काम पूर्ण करून प्रवाशांची सोय करणे अधिक महत्त्वाचे नव्हते का? या गलथान कारभाराला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल प्रवासी करत आहेत.