धाराशिवच्या नामांतराने जिल्ह्याच्या नावात बदल झाला असला तरी, शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील समस्या जैसे थे आहेत. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे शहरातील बसस्थानकाची दुरवस्था. नवीन बसस्थानकाच्या कामातील दिरंगाई आणि तात्पुरत्या व्यवस्थेतील त्रुटींमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येचे गांभीर्य अधोरेखित करणारी बाब म्हणजे वाढत्या चोरीच्या घटना आणि सुरक्षेचा अभाव. विकासाच्या नावाखाली सुरू असलेला हा प्रवासी छळ आता थांबला पाहिजे.
गेल्या दहा वर्षांत तीन वेळा भूमिपूजन होऊनही नवीन बसस्थानकाचे काम पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नाहीत. प्रवाशांना तात्पुरत्या उभारलेल्या पत्राच्या शेड्समध्येच थांबावे लागत आहे. या शेड्सची अवस्था अत्यंत दयनीय आहे. पावसाळ्यात या शेड्समध्ये चिखल आणि पाणी साचून प्रवाशांची कुचंबणा होत आहे. या अशा वातावरणात चोरांचा सुळसुळाट वाढणे स्वाभाविक आहे. मागील पंधरा दिवसांत अनेक प्रवासी चोरीला बळी पडले आहेत, यातून प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलीसांनी यावर कारवाई करण्याऐवजी केवळ गुन्ह्यांची नोंद करून आपली जबाबदारी झटकली आहे. पोलीस बंदोबस्ताच्या अभावामुळे चोरटे अधिकच बिनधास्त झाले आहेत. बस स्थानकावर पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहून तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. केवळ नामांतराने नव्हे, तर प्रत्यक्षात नागरिकांना चांगल्या सुविधा पुरवून खऱ्या अर्थाने विकास साधला पाहिजे. बसस्थानकाचे काम प्राधान्याने पूर्ण करून प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. यात कोणतीही चालढकल यापुढे खपवून घेतली जाणार नाही.
पोलीस बंदोबस्त वाढवून चोरीच्या घटनांना आळा घालण्याची आवश्यकता आहे. तसेच, पोलीसांनी तक्रारींची त्वरित दखल घेऊन गुन्हेगारांना पकडण्यासाठी ठोस कारवाई करावी. जोपर्यंत नवीन बसस्थानक पूर्ण होत नाही तोपर्यंत तात्पुरत्या व्यवस्थेत सुधारणा करून प्रवाशांना किमान सुविधा तरी उपलब्ध करून द्याव्यात. पावसाळ्यात चिखल होऊ नये यासाठी योग्य व्यवस्था करणे, रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश असणे याकडे लक्ष द्यावे.
विकासकामांच्या नावाखाली प्रवाशांना होणारा त्रास थांबवणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. धाराशिवकरांना आश्वासनांची नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. निवडणुकांच्या तोंडावर आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करण्याचे प्रकार थांबले पाहिजेत. खऱ्या विकासाची खरी परीक्षा ही नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील सुखसोयींमधूनच दिसून येते.
- सुनील ढेपे , संपादक, धाराशिव लाइव्ह