धाराशिव: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव शहरात शिवजन्मोत्सव ऑटो रिक्षा समितीच्यावतीने भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीचे नागरिकांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी आणि फुलांची उधळण करत नागरिकांनी आनंद व्यक्त केला. या रॅलीचे हे सलग चौदावे वर्ष आहे.
रॅलीचा मार्ग आणि उत्साह
धाराशिव शहरातील बोंबले हनुमान चौकातून रॅलीला सुरुवात झाली. रॅलीचे उद्घाटन शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शकील शेख यांच्या हस्ते करण्यात आले. रॅलीमध्ये सहभागी रिक्षांवर आकर्षक सजावट करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरी मूर्ती विशेष आकर्षण ठरल्या. रॅली बोंबले हनुमान चौकातून देवी मंदिर, गवळीवाडा, बार्शी नाका, माणिक चौक, सह्याद्री कॉर्नर, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत चौक, पोलीस मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, देशपांडे स्टँड, नेहरू चौक, काळा मारुती चौक, पोस्ट ऑफिस कार्यालय चौक, त्रिसरण चौक, अंबाला हॉटेल चौक, लेडीज क्लबमार्गे बार्शी नाका-जिजाऊ चौकात विसर्जित झाली.
घोषणांनी परिसर दणाणला
रॅलीमध्ये सहभागी नागरिकांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो’, ‘राजमाता जिजाऊंचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. भगवे ध्वज आणि एका मागोमाग येणाऱ्या रिक्षांमुळे रॅलीची शोभा अधिक वाढली.
सहभागी मान्यवर
या रॅलीमध्ये पोलीस निरीक्षक शकील शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र अंभोरे, ज्ञानेश्वर कुकलारे, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे, उल्हास उर्फ बुबा उंबरे, मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष संदीप इंगळे, अशोक उंबरे, विष्णू इंगळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.