बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गेल्या दोन महिन्यांपासून राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात सातत्याने आवाज उठवत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी अलीकडेच मुंडे यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, अनेकांनी त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
आमदार धस यांच्या या भूमिकेवर आता शिवसेना (ठाकरे गट) खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी ट्विटरद्वारे आमदार धस यांच्यावर निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांच्यावर आता कोणीच विश्वास ठेवणार नाही. धस हे भाजपच्या परंपरेस जागले. वापरा आणि फेका, वापरा आणि सौदा करा. बावनकुळे यांच्या घरी नक्की काय डील झाले?”
राऊत यांच्या या टीकेनंतर भाजपमधून काय प्रतिक्रिया येणार याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. तसेच, सुरेश धस यांच्या भूमिकेबाबत अधिक स्पष्टता मिळेल का, हे पाहावे लागेल.