ढोकी : तुगाव येथे अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून 3 लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. दिपक बबन शेंडगे (वय 42) यांच्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेंडगे हे आपल्या पत्नीसोबत नवीन घरात झोपले होते. तेव्हा चोरट्यांनी त्यांच्या जुन्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील पत्र्याची पेटी व लोखंडी कपाटातील 83 ग्रॅम सोन्याचे दागिने, 900 ग्रॅम चांदीचे दागिने व 60 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 3 लाख रुपयांचा माल चोरून नेला.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ढोकी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुढील तपास करत आहेत.
धाराशिवमध्ये घरफोडी; ७२,१०० रुपयांचा ऐवज लंपास
धाराशिव – शहरातील तांबरी विभागात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत ७२,१०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धाराशिव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादी सुनिल दत्तू ढेकणे (वय ५०, रा. कौडगाव, ह.मु. तांबरी विभाग, धाराशिव) यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री १.३० ते २.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या भावाच्या आणि आई-वडिलांच्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तींनी तोडले. घरात प्रवेश करून ६५,००० रुपये रोख रक्कम आणि रेडमी कंपनीचा मोबाईल तसेच विजय कुमार कदम यांच्या घरातील पँटच्या खिशात ठेवलेले २,१०० रुपये असा एकूण ७२,१०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला. याप्रकरणी सुनिल ढेकणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून धाराशिव पोलीस ठाण्यात कलम ३३१(४), ३०५(ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशीत शेतातून ९०,००० रुपयांचे पाइप चोरीला
वाशी – तालुक्यातील कासारखणी शिवारात अज्ञात व्यक्तींनी शेतातून ९०,००० रुपयांचे पाइप लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी उमाशंकर प्रकाश विश्वेकर (वय ४८, रा. वाणी गल्ली, वाशी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या शेत सर्वे नंबर ५२०, कासारखणी शिवार येथे फिनोलेक्स कंपनीचे २५० फूट लांबीचे १०० बंडल ठेवले होते. ८ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तींनी सदर पाइप चोरून नेले. चोरीला गेलेल्या मालाची किंमत ९०,००० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी उमाशंकर विश्वेकर यांनी १७ फेब्रुवारी २०२५ रोजी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
रांजणी येथे मोटरसायकल चोरी; १५,००० रुपयांचे नुकसान
कळंब – तालुक्यातील रांजणी येथे साखर कारखान्यासमोरून एका नागरिकाची हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सुधाकर जनार्धन बनसोडे (वय ५२, रा. घारगाव, ता. कळंब) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल (क्र. एमएच २५ ए.वाय. १०७६) ही १२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ८.४५ ते ९.०० वाजण्याच्या दरम्यान रांजणी येथील मदने हॉटेलच्या जवळून अज्ञात व्यक्तींनी चोरून नेली. सदर दुचाकीची किंमत अंदाजे १५,००० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.या घटनेबाबत सुधाकर बनसोडे यांनी १७ फेब्रुवारी २०२५ रोजी शिराढोण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा नोंदवून पोलीस अधिक तपास करत आहेत.
उमरगा येथे घरासमोरून दुचाकी चोरी; ६०,००० रुपयांचे नुकसान
उमरगा – शहरातील मदनानंद कॉलनी, मोरे पेट्रोल पंपाच्या पाठीमागे राहणाऱ्या एका नागरिकाची होंडा एस.पी १२५ मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी घरासमोरून चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रघुनाथ बलभीम भुरे (वय ५५, रा. उमरगा) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची होंडा कंपनीची एस.पी १२५ मोटरसायकल (क्र. एमएच २५ बी.सी. ५०६०) ही १३ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री १०.०० ते १४ फेब्रुवारी सकाळी ५.०० वाजण्याच्या दरम्यान रांजणी येथील त्यांच्याच राहत्या घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या दुचाकीची अंदाजे किंमत ६०,००० रुपये आहे.या घटनेबाबत रघुनाथ भुरे यांनी १७ फेब्रुवारी २०२५ रोजी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.