वाशी – शेतातील उसाची भरलेली बैलगाडी नेण्याच्या कारणावरून झालेल्या वादात बाप-लेकाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण केल्याची घटना पारगाव शिवारात घडली आहे. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी विलास भिमाबुवा पुरी (वय ५५, रा. पारगाव, ता. वाशी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पारगाव शिवारातील शेत गट नं. १३७ मध्ये त्यांचा आणि मुलगा जयदीप पुरी याचा आरोपींशी वाद झाला. प्रविण हनुमंत पुरी, आशाबाई हनुमंत पुरी आणि हनुमंत भीमाबुवा पुरी (सर्व रा. पारगाव) यांनी उसाची बैलगाडी नेण्याच्या कारणावरून त्यांच्यासोबत वाद घालत शिवीगाळ केली. यानंतर लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण करत गंभीर जखमी केले, तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
या घटनेबाबत १७ फेब्रुवारी २०२५ रोजी विलास पुरी यांनी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
तुळजापूर तालुक्यात तरुणावर लोखंडी पाइपने हल्ला; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
तुळजापूर – जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाला लोखंडी पाइपने मारहाण करून जखमी केल्याची घटना चिंचोली (ता. तुळजापूर) येथे घडली. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अनिता महावीर खारवे (वय ३५, रा. चिंचोली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १३ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास आरोपी मारुती मसाजी कांबळे (रा. चिंचोली) याने जुन्या वादाच्या कारणावरून फिर्यादींच्या मुलगा ऋषिकेश महावीर खारवे याला शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी पाइपने मारहाण करून त्याला जखमी केले.
या घटनेबाबत १७ फेब्रुवारी २०२५ रोजी अनिता खारवे यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कलम ११८(१), ११५(२), ३५२ अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
परंडा तालुक्यात किरकोळ कारणावरून बाचाबाची; तिघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल
परंडा – शेताच्या सीमारेषेवरील दगडावर ट्रॅक्टर गेल्याच्या कारणावरून झालेल्या वादात तिघांनी दोन भावांना मारहाण केल्याची घटना आवारपिंपरी (ता. परंडा) येथे घडली. या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी बालाजी अशोक गुडे (वय ३६, रा. आवारपिंपरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १७ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता त्यांचे आणि भाऊ राजकुमार गुडे यांचे शेत गट नंबर १२७ मध्ये आरोपींशी वाद झाला. पृथ्वीराज विक्रम जाधव, आनंद लक्ष्मण जाधव आणि विक्रम लक्ष्मण जाधव (सर्व रा. आवारपिंपरी) यांनी पिकाच्या कडेला ठेवलेल्या दगडावर ट्रॅक्टर गेल्याच्या कारणावरून फिर्यादी आणि त्याच्या भावाला शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांसह काठीने मारहाण करून जखमी केले.
या घटनेबाबत १७ फेब्रुवारी २०२५ रोजी बालाजी गुडे यांनी परंडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.