धाराशिव – धाराशिव शहरातील अहिल्याबाई होळकर चौकाजवळ महामार्ग बायपासलगत असलेल्या शेतातील अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेदरम्यान पोलिसांच्या बंदोबस्तावर जमावाने अचानक जोरदार दगडफेक केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, शासकीय कामात थेट अडथळा निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात महिलांसह १७ नामजद व इतर ५ अशा एकूण २२ जणांविरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अनुरथ वासुदेव घोळवे हे इतर पोलीस स्टाफसह ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ७.०० वाजेच्या दरम्यान अहिल्याबाई होळकर चौकाजवळील महामार्ग बायपासलगत भन्साळी यांच्या शेतात (सर्व्हे नं. ३७२/१ व ३७२/३) सुरू असलेल्या अतिक्रमण काढण्याच्या कारवाईदरम्यान शासकीय बंदोबस्तासाठी तैनात होते.
त्यावेळी पापनाशनगर, वरुडा व इंदिरानगर भागातील संशयितांनी संगनमत करून बेकायदेशीर जमाव जमवला. त्यांनी अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला तीव्र व हिंसक विरोध दर्शवला. आरोपींनी कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना घाणेरडी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि पाहता पाहता पोलिसांच्या दिशेने तुफान दगडफेक केली. या अचानक झालेल्या दगडफेकीत पोलीस अंमलदार जखमी झाले असून, परिसरात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता.
धाराशिव शहर पोलिसांत २२ जणांवर गुन्हा नोंद
शासकीय कामात अडथळा आणून पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी पोलीस अंमलदार अनुरथ घोळवे यांनी ३० सप्टेंबर २०२६ रोजी सरकारतर्फे फिर्याद दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी खालील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे:
-
आरोपी : सोनाली अशोक काळे, पदमा अशोक काळे, निशा दशरथ पवार, मंगल भालचंद्र पवार, लताबाई शिवा काळे, ताई अशोक काळे, रतनबाई रमेश पवार, जयाबाई रामा काळे, सारिका सिकंदर शिंदे, चंपाबाई सर्जेराव शिंदे, अकुली अनिल काळे, चंदा विजय पवार (सर्व रा. पापनाशनगर, धाराशिव), सुरेखा लाला काळे (रा. वरुडा, धाराशिव), आप्पा श्रीराम पवार (रा. इंदिरानगर, धाराशिव), अशोक मोहन काळे, दशरथ युवराज पवार, शंकर पवार व इतर ५ अनोळखी इसम.
-
दाखल कलमे : भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३२ (शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला किंवा कामात अडथळा), १२१(१), १८९(१), १९१(२), १८०, १२५ आणि १२५(अ).
शहराच्या बायपास परिसरात पोलिसांवर झालेल्या या दगडफेकीच्या घटनेमुळे पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, या प्रकरणाचा पुढील तपास धाराशिव शहर पोलीस करत आहेत.




