धाराशिव – धाराशिव जिल्हाधिकारी डॉ. सचिन छगनलाल ओम्बासे यांच्यावर बोगस नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्राचा वापर करून भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाल्याचा आरोप करत बाळासाहेब सुभेदार यांनी त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. सुभेदार यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. सीपी राधाकृष्णन यांना सादर केलेल्या निवेदनात धाराशिव जिल्हाधिकारी आणि त्यांच्याशी संबंधित विविध माध्यमांनी प्रसारित केलेल्या बातम्यांवर आक्षेप घेतला आहे.
आरोप आणि मागणीचे स्वरूप
बाळासाहेब सुभेदार यांनी दि. ३ ऑक्टोबर रोजी दाखल केलेल्या तक्रारीत दावा केला आहे की, डॉ. ओम्बासे यांनी सन २०१४ मध्ये आपल्या पालकांचे खरे उत्पन्न लपवून खोटे नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र सादर केले, ज्याचा उपयोग करून त्यांनी आरक्षित कोट्यात भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश मिळवला. सुभेदार यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, या प्रकारामुळे प्रशासनाची फसवणूक झाली असून, यावर कारवाई केली जावी.
माध्यमांमधील चर्चा आणि प्रतिसाद
सुभेदार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने माध्यमांनी हे वृत्त प्रसारित केले आहे. धाराशिव लाइव्हने प्रकाशित केलेल्या बातम्यांमध्ये डॉ. ओम्बासे यांच्यावर बोगस प्रमाणपत्र वापरल्याचे आरोप करण्यात आले. विशेषतः, “धाराशिवच्या कलेक्टर साहेबांचे बोगस प्रमाणपत्र: सरकारी हेराफेरी की स्मार्टनेस?” आणि “धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे विरुद्ध गंभीर तक्रार” अशा शिर्षकाखाली बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
सुभेदार यांनी म्हटले आहे की, जर या तक्रारीतील आरोप खोटे ठरले, तर धाराशिव लाइव्हचे संपादक सुनील ढेपे यांना फाशीची शिक्षा दिली जावी. तसेच, हे आरोप खरे ठरल्यास, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महसूल अधिकाऱ्यांचा विरोध
डॉ. ओम्बासे यांच्या समर्थनार्थ धाराशिव जिल्ह्यातील महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुभेदार यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. महसूल अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी ओम्बासे यांची बाजू घेत व त्यांच्या कार्यक्षमतेचे समर्थन करत, या आरोपांची निंदा केली आहे. महसूल अधिकारी संघटनेने यासंदर्भात निवेदन सादर करत माध्यमांकडून जिल्हाधिकाऱ्यांची होणारी बदनामी रोखण्याची विनंती केली आहे. तसेच, संबंधित माध्यमांवरील तिखट, तेल, मिठ, मसाला लावून प्रसारित झालेल्या बातम्यांचा निषेध करण्यात आला आहे.
कारवाईची मागणी
सुभेदार यांनी राज्यपालांना पाठवलेल्या निवेदनात मागणी केली आहे की, या प्रकरणाची चौकशी निपक्षपातीपणे सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून केली जावी. त्यांचे म्हणणे आहे की, जर आरोप खरे ठरले, तर माध्यमांद्वारे या विषयाला गंभीरपणे हाताळले जावे व या संपूर्ण प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केली जावी.
धाराशिव जिल्ह्यातील हे प्रकरण प्रशासनाच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असून, डॉ. ओम्बासे यांच्यावरील या आरोपांमुळे जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी होणे अपेक्षित आहे, ज्यामुळे सत्य समोर येईल आणि खोट्या आरोपांची सत्यता तपासली जाईल.
सुभेदार यांचे संपूर्ण निवेदन
दिनांक ११ ऑक्टोबर, २०२४
प्रति,
मा. श्री. सीपी राधाकृष्णन साहेब,
राज्यपाल, महाराष्ट्र राज्य,
राजभवन, वाळकेश्वर रोड, मलबार हिल, मुंबई-४०००३५
मार्फत:- अपर जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव-४१३५०१
विषय:- डॉ. सचिन छगनलाल ओम्बासे जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्यावर तथ्यहीन व
बिनबुडाचे आरोप करुन, समाज माध्यमातून बदनामी करणाऱ्याला फाशीची शिक्षा
देणेबाबत.
संदर्भ:- १) मी, दिलेले तक्रारी निवेदन दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२४
२) धाराशिव लाइव्ह वृत्त वाहिनीने प्रसारीत केलेली बातमी दिनांक ०३ ऑक्टोबर,
२०२४, दिनांक ०४ ऑक्टोबर, २०२४, दिनांक ०५ ऑक्टोबर, २०२४ व दिनांक
०९ ऑक्टोबर, २०२४
३) लोकशाही वृत्त वाहिनीने प्रसारीत केलेली बातमी दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२४
४) धाराशिव जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचारी यांनी दिलेले निवेदन
दिनांक ०७ ऑक्टोबर, २०२४
५) समय सारथी या वृत्त वाहिनीने प्रसारीत केलेली बातमी दिनांक ०३ ऑक्टोबर,
२०२४ व दिनांक ०९ ऑक्टोबर, २०२४
६) दैनिक पुण्य नगरी या वृत्त पत्राने प्रसिद्ध केलेली बातमी दिनांक ०४ ऑक्टोबर,
२०२४ व दिनांक १० ऑक्टोबर, २०२४
७) सोमनाथ तडवळकर रा. कसबे तडवळे ता. जि. धाराशिव यांनी WhatsApp
ग्रुप वरती टाकलेली पोष्ट दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२४
महोदय,
उपरोक्त विषयी आपणास कळविण्यात येते की, डॉ. सचिन छगनलाल ओम्बासे जिल्हाधिकारी, धाराशिव यांनी सन २०१४ मध्ये त्यांचे आई वडिलाचे खरे उत्पन्न लपवून, प्रशासनास खोटे उत्पन्न दाखऊन, उन्नत आणि प्रगत व्यक्ति / गट यामध्ये मोडत नसल्याचा दाखला प्राप्त करुन घेऊन, सदर बनावट दाखला सन २०१४ मध्ये संघ लोक सेवा आयोग, भारत सरकार यांच्याकडे केलेल्या अर्जासोबत जोडून, प्रशासन व संघ लोक सेवा आयोगाची फसवणूक करत, आरक्षणातून भारतीय प्रशासकीय सेवेत आल्याने त्यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात मी, सर्व पुराव्यानिशी संघ लोक सेवा आयोग, भारत सरकार यांच्याकडे संदर्भ क्रमांक १ च्या तक्रारी निवेदनाद्वारे मागणी केली असून, सदर तक्रारी निवेदनाच्या अनुषंगाने काही प्रसार माध्यमाद्वारे प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या हेडलाईन व लिंक खालील प्रमाणे देत असून, कृपया त्याचे अवलोकन व्हावे.
१. “कलेक्टर साहेबांचे बोगस प्रमाणपत्र: सरकारी हेराफेरी की स्मार्टनेस?”
२.धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांवर संशयाची सुई: प्रामाणिकतेचा प्रश्न !
https://dharashivlive.com/needle-of-suspicion-on-dharashiv-collector-question-of-integrity/
३. धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे विरुद्ध गंभीर तक्रार काही दिवसांपूर्वी गाजलेले आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण अजून जनमानसाच्या स्मरणात असतानाच, धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्याबद्दलही शंका आणि संशयाची सुई निर्माण झाली आहे. सत्यशोधक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी डॉ. ओम्बासे यांच्यावर बोगस नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र जोडून सेवेत रुजू झाल्याची तक्रार लोकसेवा आयोगाकडे केली आहे. या तक्रारीमुळे शासन आणि प्रशासकीय सेवेमधील प्रामाणिकतेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
व्हिडीओ पाहा
धाराशिव लाइव्ह या वृत्त वाहिनीने वरील अनुक्रमांक ०१ ते ०३ च्या हेडलाईन (मथळ्याखाली) दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२४ रोजी बातम्या प्रसिद्ध करताच डॉ. सचिन छगनलाल ओम्बासे जिल्हाधिकारी, धाराशिव यांनी पत्रकार परिषद घेऊन सदर बातमीचा खुलासा केला असून, त्या खुलाश्याच्या अनुषंगाने काही प्रसार माध्यमाने बातम्या प्रसिद्ध केल्या असून त्या बातमीच्या हेडलाईन व लिंक खालील प्रमाणे देत असून, कृपया त्याचे अवलोकन होण्यास विनंती आहे.
१. माझे वडील प्राध्यापक पण आई गृहिणी होती – जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे
https://dharashivlive.com/my-father-was-professor-but-mother-homemaker-collector-dr-sachin-ombase/
२. धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे बोगस Non Creamy Layer Certificate प्रकरण व्हिडीओ
३. “ कलेक्टर साहेबांना ब्लँकमेल करणारे दोन ‘धाराशिवी’ पत्रकार कोण ? साहेबांनी आता त्यांची नावेच जाहीर करावीत…
https://dharashivlive.com/who-are-the-two-dharashivi-journalists-blackmailing-the-collector/
४. धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांचे पाय आणखी खोलात बोगस नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र प्रकरण / प्रमुख मुद्दे आणि प्रश्न
https://dharashivlive.com/district-collector-dr-sachin-ombase-in-deeper-trouble-in-dharashiv/
धाराशिव लाइव्ह व लोकशाही या वृत्त वाहिनीने वरील अनुक्रमांक ०१ ते ०४ च्या हेडलाईन (मथळ्याखाली) दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२४ रोजी बातम्या प्रसिद्ध केल्याने धाराशिव जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचारी यांनी डॉ. सचिन छगनलाल ओम्बासे जिल्हाधिकारी, धाराशिव यांची बाजू घेत, प्रसार माध्यमाद्वारे त्यांची बदनामी करणाऱ्यांच्या निषेधार्थ संदर्भ क्रमांक ०४ द्वारे अपर जिल्हाधिकारी, धाराशिव यांचे मार्फत मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन व अपर मुख्य सचिव (महसूल), महाराष्ट्र शासन यांचेकडे तक्रारी निवेदन दिले असून, सदर तक्रारी निवेदनाच्या अनुषंगाने काही वृत्तवाहिनी वरती व वृत्त पत्रामध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या असून त्या बातमीच्या हेडलाईन व लिंक खालील प्रमाणे देत असून, कृपया त्याचे अवलोकन होण्यास विनंती आहे.
१. तसेच धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांच्या बोगस नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र प्रकरणात वाद पेटला महसूल अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या बाजूने धावले !
https://dharashivlive.com/dharashiv-collector-fake-non-creamy-layer-certificate-controversy/
२. निषेधाचे निवेदन – महसुल अधिकारी व कर्मचारी संघटना आक्रमक, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या बदनामीचा आरोप
https://samaysarathi.com/revenue-officer-nivedan-dharashiv/
३. दैनिक पुण्य नगरी या वृत्त पत्राने प्रसिद्ध केलेली बातमी दिनांक ०४ ऑक्टोबर,
२०२४ व दिनांक १० ऑक्टोबर, २०२४ ची सोबत छायांकीत प्रत देण्यात येत आहे.
४. सोमनाथ तडवळकर रा. कसबे तडवळे ता. जि. धाराशिव यांनी WhatsApp
ग्रुप वरती टाकलेली पोष्ट दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२४ च्या स्क्रिन शॉट ची सोबत छायांकीत प्रत देण्यात येत आहे.
तेव्हा मी, दिलेल्या संदर्भ क्रमांक ०१ च्या तक्रारी निवेदनाची व धाराशिव जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचारी यांनी दिलेले संदर्भ क्रमांक ०४ च्या निवेदनासह समय सारथी व दैनिक पुण्य नगरी या वृत्त वाहिनीने / वृत्त पत्राने / प्रसार माध्यमाने अनुक्रमे संदर्भ क्रमांक ०५ व ०६ द्वारे तिखट, तेल, मिठ, मसाला लाऊन प्रसारीत केलेल्या बातमीची तसेच डॉ. सचिन छगनलाल ओम्बासे जिल्हाधिकारी, धाराशिव यांचा चाहता असलेल्या सोमनाथ तडवळकर यांनी संदर्भ क्रमांक ०७ द्वारे WhatsApp ग्रुप वरती टाकलेली पोष्टची प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अशा सनदी अधिकारी यांचे मार्फत किंवा सेवानिवृत्त न्यायाधीश यांचे अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करुन, निपक्षपणे चौकशी करुन, चौकशी अंती मी, दिलेल्या संदर्भ क्रमांक ०१ च्या तक्रारी निवेदनातील मुद्दे व त्या अनुषंगाने धाराशिव लाइव्ह या वृत्त वाहिनीने प्रसिद्ध केलेल्या बातम्या तसेच त्या बातम्यातील दावे जर खोटे निघाले तर माझ्यासह धाराशिव लाइव्ह या वृत्त वाहिनीचे मुख्य संपादक मा. श्री. सुनिलजी मधुकर ढेपे अशा आम्हा दोघांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. परंतु मी, दिलेल्या संदर्भ क्रमांक ०१ च्या तक्रारी निवेदनातील मुद्दे व त्या अनुषंगाने धाराशिव लाइव्ह या वृत्त वाहिनीने प्रसिद्ध केलेल्या बातम्या तसेच त्या बातम्यातील दावे जर खरे निघाले तर हेतुपुरस्सर गुन्हेगाराला संरक्षण व प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने केलेली कृती ही दखलपात्र अपराध असल्याने, धाराशिव जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचारी यांनी दिलेल्या संदर्भ क्रमांक ०४ च्या निवेदनावरती ज्या अधिकारी व कर्मचारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत, त्यांचेसह संदर्भ क्रमांक ०५ व ०६ द्वारे तिखट, तेल, मिठ, मसाला लाऊन बातमी प्रसारीत करणाऱ्या समय सारथी चे संपादक संतोष सुभाष जाधव व दैनिक पुण्य नगरी चे जिल्हा प्रतिनिधी धनंजय श्रीमंत रणदिवे यांचेसह दैनिक पुण्य नगरी या वृत्त पत्राचे चालक / मालक / संपादक तसेच डॉ. सचिन छगनलाल ओम्बासे जिल्हाधिकारी, धाराशिव यांचा चाहता असलेल्या सोमनाथ तडवळकर यांचेवरती देखील कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ही आपणास आदरपूर्वक विनंती.
सोबत:- संदर्भ क्रमांक ०१, ०४, ०६ व ०७ तसेच महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन परिपत्रक क्रमांक: सीबीसी-२०१२/प्र.क्र.१८२/विजाभज-१ दिनांक २५ मार्च, २०१३ ची छायांकीत प्रत.
आपला,
(बाळासाहेब सुभेदार)
प्रत:- १. सुजाता सौनिक (भा.प्र.से.) मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मादाम कामा मार्ग,
हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२ यांना यथायोग्य त्या
कार्यवाहीस्तव देण्यात. (मार्फत:- अपर जिल्हाधिकारी, धाराशिव)
२. अपर मुख्य सचिव (महसूल), महाराष्ट्र शासन, मादाम कामा मार्ग,
हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२ यांना यथायोग्य त्या
कार्यवाहीस्तव देण्यात. (मार्फत:- अपर जिल्हाधिकारी, धाराशिव)