धाराशिव – विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यामुळे इच्छुक उमेदवारांची गर्दी मैदानात उतरली आहे. नोव्हेंबरमध्ये निवडणूक होणार हे जाहीर झालं असलं तरी, तारखेच्या घोषणा अजूनही प्रलंबित आहेत. मात्र, इच्छुकांची उत्सुकता आटोक्यात राहिली नाही. त्यामुळे काँग्रेस भवनमध्ये मुलाखतींचं नाटक रंगून गेलं, आणि राजकीय रंगभूमीवर विनोदाची मालिका सुरू झाली.
काँग्रेसच्या धाराशिव जिल्हा कार्यालयात, पक्ष निरीक्षक एम. एम. शेख यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या, जणू काही हा विधानसभेचा कॅटवॉक शो आहे! दुपारी दोन ते साडेपाच या वेळेत या शोचा फर्स्ट क्लासपासून जनरल बोगीपर्यंत सर्व वर्गातील उमेदवारांनी सहभाग घेतला. काँग्रेसचे तिकीट सोनिया गांधी, राहुल गांधी, आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडून दिल्लीत फायनल होणार असलं तरी, शेख साहेबांनी आज ‘डेटा कलेक्शन’चा सोहळा साजरा केला. या सोहळ्याला इच्छुकांनी आपल्या संवाद कौशल्याचं जोरदार प्रदर्शन केलं.
धाराशिव जिल्ह्यातील चार मतदारसंघांसाठी काँग्रेसकडे एकही विद्यमान आमदार नाही. त्यामुळेच इथलं वातावरण काहीसं ‘आंधळ्याच्या हातात आलेला द्राक्षांचा घड’ सारखं आहे. आता काँग्रेसला कोणता मतदारसंघ महाविकास आघाडीतून मिळणार, याबद्दल काहीच निश्चितता नाही. मात्र तुळजापूर आणि उमरगा मतदारसंघांबाबत काँग्रेसला आशेचा किरण दिसत आहे. हे पाहून इच्छुकांची रांग वाढल्याशिवाय राहिली नाही.
तुळजापूर मतदारसंघात ९ इच्छुकांची मुलाखत झाली. यात विशेष लक्षवेधी म्हणजे ९० वर्षांचे तरुण तुर्क मधुकरराव चव्हाण, जे पाच वेळा आमदार राहिलेले आहेत आणि मागील निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यांनी ‘मीच कसा उमेदवारीसाठी लायक’ हे सांगताना अनुभवाचा डंका वाजवला. मात्र, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी सरळपणे चव्हाण साहेबांना निवृत्तीचा सल्ला देत, “तुमचं झालं आता, मलाच उमेदवारी द्या,” असा आग्रही विनंतीवजा हल्ला चढवला.
याच मुलाखतीत आणखी एक विनोदी पात्र प्रकट झालं, ते म्हणजे देवानंद रोचकरी! या भाऊंनी यापूर्वी विविध पक्षांच्या तिकिटांवर निवडणुका लढवल्या आहेत, आणि आता काँग्रेसकडून सुदैव आजमावण्याचं ठरवलंय. त्यांचं उमेदवारीचं तर्कशास्त्र मात्र अजूनही गावकऱ्यांच्या चर्चेचा विषय आहे. त्यांच्या जोडीला अणदूरचे सरपंच रामदादा आलुरे, माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे आणि मुकुंद डोंगरे यांच्यासारख्या लोकांनीही आपली मुलाखत देऊन काँग्रेस भवनात चैतन्य आणलं.
उमरगा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागांपैकी एक आहे, आणि इथल्या इच्छुकांची संख्याही कमी नाही. दोन वेळा पराभूत होऊनही हिम्मत न हरलेले दत्तू भालेराव, जे थेट दिल्लीत जाऊन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटून आले आहेत, यावेळी पुन्हा रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या जोडीला राजा शेरखाने, विजय वाघमारे, अमर कोथींबीर, सचिन सुटके, आणि कोमल भालेराव या इतर इच्छुकांनी देखील उमेदवारीसाठी अर्ज भरले आहेत.
परंडा मतदारसंघात मात्र निवडणुकीच्या हवेतून थंड वारा सुटल्यासारखं झालं आहे, कारण या ठिकाणी इच्छुकांचा शून्य आकडा पाहायला मिळाला. एकंदरीत, हे मतदारसंघ ‘स्पेशल ऑफर’वर ठेवलेलं दिसतं! धाराशिवमधून काँग्रेस – बीआरएस पुन्हा काँग्रेस असा प्रवास केलेले विधी विभागाचे ऍड. विश्वजित शिंदे-सरकार आणि कळंबचे तालुका अध्यक्ष पांडुरंग कुंभार यांनी हरी ओम म्हटले !
संपूर्ण चित्र पाहता, इच्छुक उमेदवारांनी काँग्रेसच्या तिकिटासाठी एक सापशिडीचा खेळ सुरू केला आहे. कुणी तरुण तुर्क निवृत्त होण्याचं नाव घेत नाही, तर कुणी एकापाठोपाठ अनेक पक्ष बदलत ‘राजकीय टूरिस्ट’ बनले आहेत. या सगळ्या गडबडीत, मतदारांना शेवटी कोण उमेदवार म्हणून मिळणार हे मात्र एक मोठं कोडं आहे. उमेदवारीचा खेळ कसा रंगतो आणि निवडणुकीच्या मैदानात कोणता ‘खळखट्याक’ होतो, हे पाहण्यासाठी आता सगळेच उत्सुक आहेत!