धाराशिव : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस उरले असतानाच धाराशिव मतदारसंघात सध्या उमेदवारांच्या “मिळाले – कटले” खेळाने रंगत आणली आहे. आठ मोठ्या चेहऱ्यांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी चाललेली रस्सीखेच आणि तर्क-वितर्कांची फड रंगलेला आहे.
महायुतीच्या नेता मंडळींचे हाल बघायला लायक आहेत. जणू काही शिंदे साहेबांना “अरे देवा, कोणाला द्यायचं तिकीट!” या गाण्याचं लाईव्ह प्रदर्शन पहायला मिळतंय. एकदा सुधीर पाटीलचा आवाज वाढतो, तर दुसऱ्या क्षणाला केशव सावंत उंचावतात. नितीन काळे यांनी तर नवीनच ट्विस्ट आणत भाजपला टाटा बायबाय करून शिवसेनेत प्रवेशाचा इशारा दिला आहे. जणू ते म्हणतायत, “तुम्ही कुणाला निवडता बघूया, पण मी आपला त्यातल्या त्यात खेळत राहणार!”
सध्या मतदारसंघात एक गूढ आणि धमाल वातावरण तयार झालंय. समर्थकांच्या गटात एकच घोषणा सुरु आहे – “मिळाले – मिळाले ! कटले – कटले !! आणखी कोण कोण येणार?” उमेदवारीच्या या ढोंगात नेतेगणांची अवस्था क्रिकेट सामन्यातील ‘अंतीम चेंडूवर सर्वस्व पणाला’ ठेवल्यासारखी झाली आहे.
आता धाराशिवकरांना काय पाहिजे? ते मात्र उमेदवारांच्या या खेळाचा आस्वाद घेत आहेत, कारण त्यांना मजा वाटतेय – “कुणाच्या नशिबात तिकीट येणार, हे पहायचं आणि कटले-कटले म्हणायचं!”