उमरगा – उमरगा पोलिसांनी गुरुवारी स्वामी समर्थ एंटरप्रायजेस या दुकानावर छापा टाकून 6,18,385 रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी दुकानदार महादेव बंडप्पा शिवनेचारी (वय 54, रा. गुंजोटी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या आदेशानुसार उमरगा पोलीस ठाण्याचे पथक गुरुवारी अवैध धंद्यांविरुद्ध कारवाईसाठी गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना गुप्त माहिती मिळाली की, शिवनेचारी यांच्या दुकानात प्रतिबंधित गुटखा साठवण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ छापा टाकून हा गुटखा जप्त केला.
शिवनेचारी यांच्याविरुद्ध भादंवि कलम 274, 275, 223, 123 आणि अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 कलम 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी शेलार, पोलीस निरीक्षक भोसले, पोउपनि पुंजरवाड आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.