धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात मंगळवारी लागू करण्यात आलेली संचारबंदी आज ( बुधवार ) रोजी सायंकाळी पाच वाजता उठवण्यात आली आहे. संचारबंदीचा हा आदेश रद्द करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले.
जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे – पाटील यांनी दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरु केल्यानंतर त्यांना पाठींबा देण्यासाठी जिल्हाभरात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली तसेच अनेक ठिकाणी कॅण्डल मोर्चा काढण्यात आला. तसेच अनेक ठिकाणी रस्ता रोको आंदोलन कऱण्यात आले. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने तसेच एसटीची जाळपोळ केल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी मंगळवारी संचारबंदी लागू केली होती.
मंगळवारी जिल्ह्यात दिवसभर तणावपूर्ण शांतता होती. एक – दोन किरकोळ प्रकार वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. त्यामुळे आज ( बुधवार ) रोजी सायंकाळी पाच वाजता संचारबंदीउठवण्यात आली आहे. संचारबंदीचा हा आदेश रद्द करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले.
आज सायंकाळी 5 वाजेपासून धाराशिव जिल्ह्यातील संचारबंदी शिथिल करण्यात आलेली आहे. तथापि जमावबंदी व शस्त्रबंदी लागू असेल.
जिल्ह्यात मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध भागात धरणे, आंदोलने,रस्तारोको व उपोषणे सुरू आहे.उमरगा तालुक्यातील तुरोरी येथील कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस जाळण्यात आली. शेजारच्या बीड जिल्ह्यात आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना घडलेल्या आहेत.या घटनांच्या पडसादामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जिल्ह्यात चालू असलेल्या आंदोलनामुळे सार्वजनिक व खाजगी मालमत्तेस मोठ्या प्रमाणात हानी पोहोचत आहे.त्यामुळे जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 (2) चे संचारबंदीचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी लागू केले होते.
संचारबंदी कालावधीत बंद असलेली मद्यविक्री दुकाने आजपासून सुरु
मराठा समाजास कुणबी आरक्षण देण्याबाबतच्या मागणीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध भागात धरणे, आंदोलने, रस्ता रोको, उपोषण आदी चालू आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टिने जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्त्या पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्यात आली होती.
जिल्ह्यामध्ये 30 ऑक्टोंबरपासून लागू करण्यात आलेले संचारबंदी आदेश आज 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजतापासून रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्त्यांचे बंद करण्यात आलेले व्यवहार आज सायंकाळी 5 वाजेपासून पुढे सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांनी दिले आहे.