धाराशिव: ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक झालेल्या सापनाई येथील रोहित पवार यांना धाराशिव सायबर पोलिसांनी दिलासा दिला आहे. पवार यांची ५.५९ लाख रुपयांची फसवणूक झाली होती, त्यापैकी ३.७१ लाख रुपये पोलिसांनी परत मिळवले आहेत.
पवार यांना अनोळखी व्यक्तीने फोन करून ‘Arista Group Pvt. Ltd’ या टेलीग्राम ग्रुपमध्ये सामील होण्यास सांगितले. त्यानंतर ‘Coin DCX’ नावाचे अॅप डाउनलोड करून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. जास्त नफ्याचे आमिष दाखवल्याने पवार यांनी टप्प्याटप्प्याने ५.५९ लाख रुपये गुंतवले. मात्र, नफ्याची मागणी केल्यावर त्यांना ग्रुपमधून काढून टाकण्यात आले.
पवार यांनी धाराशिव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपींची बँक खाती गोठवली. बँकांच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ३.७१ लाख रुपये पवार यांना परत मिळवून दिले.
पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश कासुळे, सफौ कुलकर्णी यांच्यासह पोलिसांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
सायबर पोलिसांचे आवाहन: अनोळखी व्यक्तींच्या मेसेज, लिंक, फोन किंवा क्यूआर कोडद्वारे कोणतीही माहिती शेअर करू नका. अशा प्रकारची फसवणूक झाल्यास तात्काळ हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी.