धाराशिव: व्हॉट्सॲप ग्रुपवर आलेल्या बनावट आरटीओ चलनाची एपीके फाईल (APK File) डाउनलोड केल्याने एका गृहिणीला तब्बल १ लाख ९९ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. मात्र, धाराशिव सायबर पोलिसांनी (Dharashiv Cyber Police) अत्यंत जलद आणि तांत्रिक कौशल्याने तपास करत या गुन्ह्याचा छडा लावला. सायबर चोराने फसवणुकीच्या पैशातून केलेली ऑनलाईन खरेदीची ऑर्डर रद्द करून फिर्यादी महिलेला त्यांची संपूर्ण रक्कम परत मिळवून दिली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
कळंब तालुक्यातील रहिवासी असलेल्या २१ वर्षीय गृहिणी श्रीमती रिया निखिल अंधारे यांना दि. २३ जुलै २०२५ रोजी त्यांच्या व्हॉट्सॲपवरील एका ग्रुपवर आरटीओ चलनासंबंधी एक एपीके फाईल प्राप्त झाली. त्यांनी ती फाईल डाउनलोड केली असता, काही वेळातच त्यांच्या मोबाईलवर एकामागून एक ओटीपी (OTP) येऊ लागले आणि पैसे डेबिट झाल्याचे संदेश धडकले. त्यांच्या क्रेडिट कार्डमधून एकूण १,९९,००० रुपये काढण्यात आल्याचे लक्षात येताच त्यांना मोठा धक्का बसला.
प्रकार लक्षात येताच श्रीमती अंधारे यांनी क्षणाचाही विलंब न लावता राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधला आणि एनसीसीआर पोर्टलवर (NCCR Portal) रीतसर तक्रार दाखल केली.
पोलिसांनी असा लावला छडा
तक्रार प्राप्त होताच धाराशिव सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक तपासात असे निष्पन्न झाले की, फसवणुकीची रक्कम ‘इन्फीबीम ॲव्हेन्यू पेमेंट गेटवे’द्वारे ‘ड्राईव्ह ट्रॅक प्लस एचपीसीएल’ या कंपनीकडे हस्तांतरित झाली आहे. पोलिसांनी तात्काळ संबंधित कंपनीच्या नोडल अधिकाऱ्यांशी ईमेल आणि फोनद्वारे संपर्क साधला.
पुढील तपासात असे उघड झाले की, आरोपीने या पैशांमधून ऑनलाईन शॉपिंग केली होती. सायबर पोलिसांनी तात्काळ संबंधित शॉपिंग कंपनीच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला आणि सायबर गुन्हेगाराने दिलेली ऑर्डर रद्द करण्याची विनंती केली. पोलिसांच्या अथक प्रयत्नांना यश आले आणि कंपनीने ती ऑर्डर रद्द करून फिर्यादीचे १,९९,००० रुपये परत केले.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चोरमले, सहाय्यक पोलीस निरीक्षक कामुळे, पोलीस उपनिरीक्षक सर्जे आणि त्यांच्या पथकाने केली.
सायबर पोलिसांचे नागरिकांना आवाहन
या घटनेच्या पार्श्वभूमीवर सायबर पोलिसांनी नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
- कोणत्याही अनोळखी मोबाईल नंबरवरून आलेल्या मेसेज, लिंक किंवा एपीके फाईलवर क्लिक करू नका.
- फोनवर किंवा लिंकद्वारे बँक खात्याची माहिती, पिन किंवा ओटीपी कोणालाही देऊ नका.
- कोणताही क्यूआर कोड (QR Code) खात्री केल्याशिवाय स्कॅन करू नका.
- तुमच्यासोबत कोणताही सायबर गुन्हा घडल्यास, २४ तासांच्या आत हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा.