धाराशिव – तालुक्यातील दाऊतपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या भ्रष्ट मुख्याध्यापकास पाठीशी घालणाऱ्या गट शिक्षणाधिकारी असरारअहमद सय्यद यांना आपणाविरूध्द प्रशासकीय कारवाई का करण्यात येऊ नये , अशी अंतीम कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
धाराशिव तालुक्यातील दाऊतपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ तोडकरी हे मुख्यालयी न राहता त्यांच्या मासिक वेतन बिलासोबत शासनाकडून घरभाडे भत्ता उचलून शासकीय रक्कमेचा अपहार करीत असल्याची तक्रार सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी शिक्षणाधिकारी ( प्रा.) यांच्याकडे केली होती.
या तक्रार अर्जाची चौकशी करून अहवाल मागविला असता गट शिक्षणाधिकारी,असरारअहमद सय्यद यांनी तोडकरी यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. तोडकरी यांच्याशी संगनमत करून अहवाल देण्यास जाणीवपूर्वक उशीर करणे, चुकीचा आणि अर्धवट अहवाल देणे, असे उद्योग त्यानी केले. याप्रकरणी गट शिक्षणाधिकारी असरारअहमद सय्यद यानां याप्रकरणी प्रशासकीय कारवाई का करण्यात येऊ नये , अशी अंतीम कारणे दाखवा नोटीस शिक्षणाधिकारी ( प्रा. ) अशोक पाटील यांनी दिली आहे.
धाराशिव तालुक्यातील अंबेहोळच्या जिल्हा परिषद शाळेत काही दिवसापूर्वी बालविवाह झाला होता. याप्रकरणी संबंधित मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यास गट शिक्षणाधिकारी असरारअहमद सय्यद यांनी दिरंगाई करून हातमिळवणी केली आहे. गट शिक्षणाधिकारी, असरारअहमद सय्यद यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी असून, त्यांची येथून उचलबांगडी करावी, अशी मागणी होत आहे.