धाराशिव : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील (DIET) प्राचार्य दयानंद जटनुरे यांनी 2021-22 आणि 2022-23 या आर्थिक वर्षांत शासनाकडून पीएफएमएस प्रणालीद्वारे प्राप्त झालेल्या निधीचा गैरवापर करत तब्बल ₹4,10,134 स्वतःच्या बँक खात्यावर वर्ग केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होऊन सहा महिने उलटले तरी दोषींवर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते भास्कर महादेव वारे यांनी 10 मार्च 2025 पासून मंत्रालयासमोर प्राणांतिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
शासन निधीचा अपहार, चौकशी अहवालाची दडपशाही
माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रांनुसार, लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या चौकशी अहवालातही अपहार सिद्ध झाला आहे. अहवालानुसार, ₹3,95,000/- (दि. 29/03/2023) व ₹15,134/- (दि. 30/03/2024) अशी रक्कम प्राचार्य जटनुरे यांनी स्वतःच्या बँक खात्यावर वर्ग करून बोगस पावत्या तयार केल्या. या गैरव्यवहारासंदर्भात शिक्षण आयुक्त, पुणे यांनी प्रधान सचिव (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय) यांना सहा महिन्यांपूर्वी चौकशी अहवालासह दोषींवर कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र, संबंधित वरिष्ठ अधिकारी अहवाल दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांना निवेदन, तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी
या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते भास्कर वारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री दादा भुसे आणि पोलिस प्रशासनाकडे दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबनाची मागणी केली आहे. अन्यथा 10 मार्च 2025 पासून मंत्रालयासमोर प्राणांतिक उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच आपल्या जीवाला काहीही झाले तर संपूर्ण जबाबदारी शिक्षण विभाग आणि प्रशासनावर राहील, असेही त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
शासनाच्या दुर्लक्षामुळे भ्रष्टाचाराला खतपाणी?
शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात निधी गैरवापर केला जात असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यास शासन अपयशी ठरत असल्याचेही हे प्रकरण दाखवते. आता मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.